प्रसिद्ध युवा गायक, वादक, गीत व संगीतकारांची उपस्थिति; बैठक, नागपूर व अलग अँगल यांचा संयुक्त उपक्रम
नागपूर समाचार : अलग अँगल कम्युनिटी आर्ट सेंटर आणि बैठक, नागपूर यांच्या संयुक्तवतीने मध्य भारतातील आगळावेगळा असा ‘इंडिया म्युझिक फेस्ट – 2023’ नागपुरात प्रथमच येत्या, 14 व 15 जानेवारी 2023 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात देशभरातील नवनवीन प्रयोग करणारे गायक, वादक, गीत व संगीतकार, अभ्यासकांच्या कार्यशाळा, व्याख्यान आणि सादरीकरण अशी मेजवानी मिळणार आहे.
टेडेक्स स्पीकर 17 वर्षीय युवा संगीतकार रिद्धी विकमशी यांनी नावीन्यपूर्ण आणि मूळ भारतीय संगीताचा प्रचार व प्रसार करण्यासाठी बैठक हा उपक्रम सुरू केला आहे. विविध पार्श्वभूमी लाभलेले गीतकार, संगीतकार, वादकांकडून स्थानिक कलाकारांना शिकण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची, त्यांच्यासोबत काम करण्याची संधी प्राप्त व्हावी, हा या फेस्टीवल आयोजित करण्यामागचा उद्देश आहे, असे मत रिद्धी विकमशी यांनी व्यक्त केले.
मेकर्स अड्डा, अलग अँगल कम्युनिटी आर्ट सेंटर, सांदीपनी शाळेच्या मागे, हजारी पहाड येथे हा दोन दिवसीय महोत्सव होत आहे. यात महोत्सवात भारतातील पहिल्या लाईव्ह लुपिंग आर्टीस्ट वसुदा शर्मा, प्रयोगशील पार्श्वगायक, संगीतकार अवंती पटेल, वैविध्यपूर्ण शैलीचे गायक, वादक, संगीत संयोजक कार्थिक सेकरण, गायक, गीतकार, कवी व वाद्यनिर्माते कविश सेठ, सुफी गायक गौरव चाटी तसेच, संगीतकार, गायक, निर्माते समृद्धा आरके यांचा सहभाग राहणार आहे. महोत्सवात गीत लेखन, संगीत निर्मिती, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, सुफी संगीत, वाद्यनिर्मिती अशा अनेक विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
50 प्रतिभावंताना देणार शिष्यवृत्ती
‘इंडिया म्युझिक फेस्ट– 2023’ मध्ये सहभागी होण्यासाठी नवनवीन प्रयोग करणारे, कल्पक युवा गायक, संगीतकार, गीतकार यांना शिष्यवृत्ती देण्यात आहे. शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी www.baithaknagpur.com या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज पाठवायचा आहे. निवडक 50 प्रतिभावंतांना फेस्टीवलमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.