- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : प्रतिभावंतच माध्यमांची उंची वाढवतात; पत्रकार दिनाला आयोजित ‘गोलमेज’ चर्चेतील सूर 

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांना जयंतीदिनी अभिवादन

नागपुर समाचार : प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स असो की डिजीटल पत्रकारितेत प्रत्येक माध्यमांचे आपले महत्व आहे. या माध्यमांचा वापर करणारे व्यक्तिमत्व किती अभ्यासू, समाजाभिमुख, सामाजिक जाणिवा ठेवणारे आहे, यावर त्या माध्यमांची उंची वाढत जाते, असा सूर पत्रकार दिनाला आयोजित ‘गोलमेज’ चर्चेत व्यक्त झाला.

नागपूर जिल्हा माहिती कार्यालय व नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित ‘माध्यमांचे भवीतव्य आणि माध्यमांचे वापरकर्ते’ या विषयावरील गोलमेज चर्चेत नागपूर जिल्हा मराठी संघाचे कार्याध्यक्ष सुभाष वऱ्हाडे, वरिष्ठ पत्रकार व टाईम्स ऑफ इंडिया वरिष्ठ सहसंपादक वैभव गंजापुरे, वरिष्ठ पत्रकार लोकसत्ताचे खास प्रतिनिधी विजय भाकरे, नागपूर जिल्हा मराठी संघाचे विभागीय सचिव संजय देशमुख,ज्येष्ठ पत्रकार तथा जलतज्ज्ञ चला जाणूया नदीला समितीचे अशासकीय सदस्य प्रवीण महाजन, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके व पत्रकार सहभागी झाले होते. 

प्रिंट माध्यमाला 200 वर्षाची परंपरा आहे. संपादन ते प्रकाशन असे वळण आहे. अनेक गाळण्या आहे. तसेच आता डिजीटल माध्यमांनी देखील हे वळण हळूहळू स्वीकारणे सुरु केले आहे. कायदे , नियम आणि पात्रतांचे बंधन घालून प्रत्येक माध्यमांना सशक्त केल्या जाऊ शकते. सुरुवातीच्या काळानंतर प्रत्येक माध्यम आपली पाळेमुळे रुजवायला सुरुवात करते. माध्यम सशक्त होण्याची ही प्रक्रीया आहे, असे सर्व माध्यम प्रतिनिधींनी प्रथम मत व्यक्त केले.

प्रिंट मिडीयाला आजही महत्व असून शासनाने सोशल मिडीयावर नियंत्रण ठेवले पाहीजे, त्यासोबतच काही बंधने असावीत. प्रिंट माध्यमात लिखाण अनेक चाळणीतून जात असल्याने व त्यावर संस्कार होत असल्याने आजही प्रिंट मिडीयाचे अस्तित्व कायम आहे, असे वैभव गजापूरे म्हणाले. 

जुनी पत्रकारीता व आधूनिक पत्रकारीतामध्ये मोठा फरक जाणवतोय, त्यामुळे दर्जात्मक लिखाणास आजही वाव आहे. मुद्रित माध्यमांचे सौंदर्य विश्वासार्हता आहे. सर्वच माध्यमांनी हा पाया ठेवावा. माध्यमांची विश्वासार्हता ठेवणे सर्वकालीन आवश्यक असल्याचे विजय भाकरे म्हणाले.  

प्रिंट मिडीयामध्ये बातमी एडिटींग होणे गरजेचे असून त्यामुळे बातमीची विश्वासार्हता वाढेल, प्रिंट मिडीयाचे अस्तित्व संपणारे नाही. सोशल मिडीयात विश्वासार्हता नाही. त्यामुळे प्रिंट मिडीयाला आजही अनन्य साधारण महत्व आहे. त्यासाठी डिजिटल माध्यमांची विश्वासार्हता वाढविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन वऱ्हाडे यांनी केले.

अभ्यासू व विश्वासू पत्रकारामुळे प्रिंट मिडीयाला महत्व आहे. तत्काळ संदेशासाठी इलेक्ट्रानिक मिडीयाचे महत्व आहे. आजच्या काळात भान ठेवून पत्रकारीता करणे आवश्यक असून त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, असे मत भागवत लांडे यांनी मांडले.

आजही पत्रकारितेत ग्रामीण व शहरी असे मतप्रवाह असून मूल्य नाही म्हणून किंमत नाही असे ठरविणे योग्य नाही. प्रिंट मिडीया आजही माफक दरात वृत्तपत्र देवून माहितीद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहचवित आहे. शोध पत्रकारीतेला महत्व असल्याचे प्रविण महाजन यांनी सांगितले. पत्रकारासाठी अनुभवाचे प्रमाण लावणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. 

यावेळी नव्या माध्यमाला समाजात रुजण्यास वेळ लागेल. मात्र प्रिंटकडे विश्वासार्हता आहे तर डिजिटल माध्यमांकडे गती आहे. आजच्या जगाला गतीवर स्वार व्हायला आवडते. त्यामुळे नवा डिजिटल मीडिया माध्यमांवर अधिराज्य गाजवेल. या माध्यमाला समाजामध्ये रुजायला वेळ लागणार नाही असे प्रतिपादन, पत्रकार क्षीतिजा देशमुख यांनी केले. अन्य पत्रकारांनीही ग्रामीण भागातील माध्यमांच्या समस्या, तसेच डिजीटल माध्यमाना प्रवाही करण्याचे आवाहन केले. 

प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन माहिती अधिकारी श्वेता पोटुडे यांनी केले तर मान्यवरांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील प्रिंट इलेक्ट्रॉनिक्स व डिजिटल माध्यमांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *