केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
नागपूर समाचार : विदर्भाच्या साहित्य क्षेत्रातील मातृसंस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाचे हे शतक महोत्सवी वर्ष सुरू आहे. दिनांक १४ जानेवारी १९२३ रोजी मकरसंक्रांतीला स्थापन झालेल्या विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापन दिनी दरवर्षी वाङ्मय पुरस्कार वितरण केले जाते. यावर्षी हा शतक महोत्सवी समारोह असून त्याचे आयोजन शनिवार दिनांक, १४ जानेवारी २०२३ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलाच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या रंगशारदा सभागृहात सायंकाळी ५.०० वाजता करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.ना. नितीन गडकरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेन्द्र फडणवीस आणि वन व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांची विशेष उपस्थिती राहील. ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांच्यासह शताब्दी महोत्सवाचे संयोजक मा.श्री. गिरीश गांधी, मा.डॉ. पिनाक दंदे आणि मा. श्री. आशुतोष शेवाळकर तसेच, संस्थेचे विश्वस्तद्वय न्या. विकास सिरपूरकर आणि डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांचीही उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते राहतील.
यंदाच्या पत्रमहर्षी ग.त्र्यं. माडखोलकर स्मृती जीवनव्रती पुरस्काराचे मानकरी झाडीबोलीचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्यासह डॉ. देवेन्द्र पुनसे, विशाल मोहोड, डॉ. राजेंद्र रंगराव राऊत, किरण शिवहरी डोंगरदिवे, डॉ. अशोक पळवेकर, एयर व्हाईस मार्शल (नि) सूर्यकांत चाफेकर, वर्षा ढोके, डॉ. माधवी जुमडे, डॉ. नितीन करमरकर, मेघराज मेश्राम, नितीन रिंढे, प्रणव सखदेव, प्रवीण खापरे आणि विदर्भ साहित्य संघाची चंद्रपूर शाखा यांनादेखील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक पु. भा. भावे, कवी श्रीधर शनवारे आणि समीक्षक डॉ. आशा सावदेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय पुरस्कार घोषित करण्यात आले असून त्याचे मानकरी अनुक्रमे डॉ. महेश खरात, पी. विठ्ठल आणि डॉ. सुरेश सावंत आहेत.
संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त घोषित विशेष पुरस्कारांचे मानकरी सीमा रोठे – शेटे, राजन लाखे, मंदिरा गांगुली, मीनल जोशी, प्रमोदिनी तापस, डॉ. वीणा गानू आणि प्रशांत पनवेलकर हे आहेत. उपरोक्त वाङ्मयीन सोहोळ्यास साहित्यरसिक नागरिकांनी अगत्याने उपस्थित राहावे, असे आवाहन विदर्भ साहित्य संघाने केले आहे.