नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीमुळे गडकरी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. गडकरी यांच्या नागपुरातील खामला परिसरातील जनसंपर्क कार्यालयात अज्ञात व्यक्तीने तब्बल तीनदा कॉल करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे नागपूर पोलिस सतर्क झाले असून गडकरी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी ही धमकी दिली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने 2 कोटी रुपयांची खंडणीही मागितली आहे. सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास धमकीचा पहिला कॉल आला. त्यानंतर ठराविक अंतराने आणखी दोनदा कॉल आले. २ कोटी रुपये द्या, अन्यथा ठार करू, अशी धमकी फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने दिली.
कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या घटनेनंतर तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने जनसंपर्क कार्यालय गाठत माहिती घेतली. फोन कुठून आला व कुणी केला आणि का केला असावा, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. सायबर पोलिसांची एक चमू सुद्धा गडकरी यांच्या कार्यालयात दाखल झाली आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सध्या नागपुरातच असून त्यांचे कार्यालय व निवासस्थानाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. गडकरी यांच्या उपस्थितीत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षाविषयक विशेष काळजी घेतली जात आहे.