क्रीडा स्पर्धांसाठी विविध समित्या गठित कराव्यात
नागपुर समाचार : जिल्हास्तरीय महसूल क्रीडा स्पर्धांचे आयोजन 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. मानकापूर येथील स्टेडियममध्ये या स्पर्धा होणार आहेत. तर विभागीय क्रीडा स्पर्धा 10,11 आणि 12 फेबुवारीला आयोजित करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्रीडा स्पर्धांसंदर्भातील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, निवारी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, पियूष चिवंडे यांच्यासह महसूल व क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
क्रीडा स्पर्धांसाठी विविध समित्या गठित कराव्यात. महसूल व क्रीडा अधिकाऱ्यांचा या समित्यांमध्ये समावेश करावा. स्पर्धांच्या प्रसिद्धीसाठी यु ट्युब, फेसबुक लाईव्ह या माध्यमांचा वापर करावा. क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सुयोग्य नियोजन करा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.
जिल्हास्तरीय महसूल क्रीडा स्पर्धा पुरुष सांघिक खेळ,पुरुष वैयक्तिक, महिला सांघिक, महिला वैयक्तिक, पुरुष आणि महिला (45 वर्षावरील) या गटात होणार आहेत. पुरुष सांघिक खेळामध्ये क्रिकेट,कबड्डी, खो-खो, व्हॅालिबॅाल, फुटबॅाल या खेळांचा समावेश आहे. तर महिला सांघिक या क्रीडाप्रकारात खो-खो, थ्रो बॅाल या क्रीडा प्रकाराचा समावेश आहे.