हाइलाइट…
- डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना ‘जीवनव्रती’ पुरस्कार प्रदान
- विदर्भ साहित्य संघाचा शतक महोत्सवी वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न
नागपूर समाचार : विदर्भ साहित्य संघाने शंभर वर्षाच्या आपल्या इतिहासात विदर्भाच्या कानाकोप-यात क्रियाशीलपणे कार्य केले. मराठी प्राध्यापक, शिक्षक, साहित्यिक, नवोदितांच्या सहकार्याने विदर्भाचे साहित्य विश्व जीवंत केले होते. समाजातील विविध क्षेत्रातील लोकांना जोडणा-या वि. सा. संघाने विदर्भातील सामाजिक मनावर संस्कार करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले, असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.
विदर्भ साहित्य संघाचे यंदाच्या शतक महोत्सवी वर्षातील वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शनिवारी सांस्कृतिक संकुलातील रंगशारदा सभागृहात करण्यात आले होते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.ना. नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते होते. मंचावर ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार, शताब्दी महोत्सवाचे संयोजक मा.श्री. गिरीश गांधी, मा.डॉ. पिनाक दंदे, श्री. आशुतोष शेवाळकर, संस्थेचे विश्वस्तद्वय न्या. विकास सिरपूरकर, डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्यासह विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, सरचिटणीस विलास मानेकर, डॉ. रमाकांत कोलते यांचीही उपस्थिती होती. विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष स्व. मनोहर म्हैसाळकर यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नितीन गडकरी व प्रदीप दाते यांच्या हस्ते झाडीबोलीचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना ‘जीवनव्रती’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी इतरही वाडमयीन पुरस्कारांचेदेखील वितरण करण्यात आले.
हरिश्चंद्र बोरकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत झाडीपट्टी भागात मोठे कार्य केले असून त्यांचा जीवनव्रती पुरस्काराने विदर्भ साहित्य संघाने केलेला गौरव योग्य असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. मनोहर म्हैसाळकर हे विदर्भ साहित्य संघाचे मजबूत पिल्लर होते. त्यांनी सर्वांना सांभाळून घेत अतिशय तळमळीने वि. सा. संघाचे कार्य पुढे नेले. त्यांच्या पश्चात आता नव्या पिढीने हे कार्य पुढे न्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
मराठी भाषा, मराठी साहित्याला युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज व्यक्त करताना वि. सा. संघाचे कार्य अधिक लोकाभिमुख करण्याकरिता नाविन्यपूर्ण प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
डॉ. गिरीश गांधी यांनी विदर्भ साहित्य संघाचा इतिहास सांगताना आतापर्यंत झालेल्या अध्यक्षांच्या कार्याचा गौरव केला. प्रदीप दाते यांनी अध्यक्षीय समारोपातून संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत संस्थेच्या उत्कर्षात ज्यांचे योगदान लाभले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
प्रास्ताविक डॉ. राजेंद्र डोळके यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. विवेक अलोणी व वृषाली देशपांडे यांनी केले. डॉ. गजानन नारे यांनी आभार मानले. वैशाली उपाध्याय यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
वि.सा. संघाने नवप्रवाहाना सामावून घ्यावे – महेश एलकुंचवार
मागील साठ वर्षात अनेक नवे साहित्य प्रवाह उदयास आले असून त्या सर्वांना सामावून घेण्याचा विदर्भ साहित्य संघाने प्रयत्न केला पाहिजे आणि साहित्य चळवळीला सशक्त केले पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केली.
लिहित्या हातांना पुरस्कार समर्पित – डॉ. हरिश्चंद्र बोरकर
आजच्या काळात लेखन, वाचन व ऐकणे कमी झाले असल्याची खंत व्यक्त करताना डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी जीवनव्रती पुरस्कार हा लिहित्या हातांना व वाचत्या डोळ्यांना समर्पित केला. सत्काराला उत्तर देताना विदर्भ साहित्य संघाचे तसेच, ग्रामीण भागातील लोकांचे त्यांनी आभार मानले व आजचा दिवस अमृत दिवस असल्याचे त्यांनी सांगितले.
वाडमय पुरस्कार विजेते…
पु.य.देशपांडे स्मृती कादंबरीलेखन पुरस्कार – ‘इथे जिंकला बाजार’: देवेंद्र पुनसे
वा.कृ.चोरघडे स्मृती कथालेखन पुरस्कार – ‘कुचंबना’ : विशाल मोहोड
य.खु.देशपांडे स्मृती शास्त्रीय लेखन पुरस्कार – ‘लीळाचरित्रातील कथनरूपे’ : डॉ. राजेंद्र रंगराव राऊत
कुसुमानिल स्मृती समीक्षा लेखन पुरस्कार – ‘काव्यप्रदेशातील स्त्री’ : किरण शिवहरी डोंगरदिवे
शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृती कवितालेखन पुरस्कार – ‘असहमतीचे रंग’ : अशोक पळवेकर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृती चरित्र/आत्मचरित्र लेखन पुरस्कार – ‘निळाईच्या छटा’ : एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर
वा.ना.देशपांडे स्मृती ललित लेखन पुरस्कार – ‘गारवा आणि झळा’: वर्षा ढोके
मा.गो.देशमुख स्मृती संत साहित्य लेखन पुरस्कार – ‘पायरीचा चिरा’ : डॉ.माधवी जुमडे
नवोदित साहित्य लेखन पुरस्कार….
नितीन करमरकर यांचा ‘समर्पण’ हा कथासंग्रह
मेघराज मेश्राम यांचा ‘माणूस असण्याच्या नोंदी’ हा कवितासंग्रह
राज्यस्तरीय पुरस्कार….
पु.भा.भावे स्मृती पुरस्कार – महेश खरात यांच्या ‘बुर्गांट (कादंबरी)
श्रीधर शनवारे स्मृती पुरस्कार – पी.विठ्ठल यांच्या ‘मी सार्वकालिक सर्वत्र’ (कवितासंग्रह)
डॉ.आशा सावदेकर स्मृती पुरस्कार – डॉ.सुरेश सावंत यांच्या ‘वाचनसंस्कृती, लेखनसंस्कृती’ (संकीर्णलेखन)
शताब्दी वर्ष विशेष पुरस्कार…
‘गावकारागीरांचे शब्द-जीवनचित्र’: सीमा रोठे शेट्ये
बाङला मराठी शब्दकोश : संपादक: मंदिरा गांगुली,मीनल जोशी,प्रमोदिनी तापास आणि डॉ वीणा गानू
राजन लाखे संपादित’बकुळगंध’
प्रशांत पनवेलकर यांच्या ‘नवा पेटता काकडा’
इतर पुरस्कार….
कविवर्य ग्रेस स्मृती पुरस्कार – डॉ. नितीन रिंढे ‘परकाया प्रवेश’ या लेखासाठी शांताराम कथा पुरस्कार प्रणव सखदेव यांच्या ‘पतंग’ या कथेसाठी उत्कृष्ट शाखा पुरस्कार – चंद्रपूर शाखा
हरिकिशन अग्रवाल स्मृती वार्तांकन पुरस्कार : ‘लोकमत’ चे प्रवीण खापरे
फोटो कॅप्शन – मंचावर उपस्थित डॉ. राजेंद्र डोळके, डॉ. रमाकांत कोलते, डॉ. रविंद्र शोभणे, डॉ. गिरीश गांधी, डॉ. हरिश्चंद्र बोरकर, महेश एलकुंचवार, नितीन गडकरी, प्रदीप दाते, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, निवृत्त न्या. विकास सिरपूरकर, आशुतोष शेवाळकर, विलास मानेकर व डॉ. पिनाक दंदे