खडा आवाज, सुरांवरची पकड आणि जोरकस ताणांनी त्यांनी सर्वांची मने जिंकली
नागपूर समाचार : सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका गौरी पाठारे यांनी ‘सिर पे धरी गंगा’, ‘महादेव महेश्वरा’ सारख्या शिवभक्तीने परिपूर्ण अशा रचना सादर करीत वातावरण अधिक भक्तीमय केले. परिसरातील नागरिकांनी त्यांच्या या भावपूर्ण गायकीचा आनंद लुटला.
घुशे परिवारच्यावतीने आयोजित प्रशांत नगर येथील अविनाश घुशे यांच्या निवासस्थानी महारुद्राभिषेक सोहळा सुरू आहे. सोहळयाच्या तिस-या दिवशी सोमवारी सुप्रसिद्ध गायिका गौरी पाठारे यांचे सुश्राव्य गायन झाले. त्यांनी राग भूप मधील बंदिश ‘जब ही सब निरपत निरास भये’ ने गायनाला सुरुवात केली. खडा आवाज, सुरांवरची पकड आणि जोरकस ताणांनी त्यांनी सर्वांची मने त्यांनी जिंकून घेतली.
शास्त्रीय रागादारी बांधलेल्या याद पिया की आये, का धरिला सजना परदेस अशा रचना सादर करून त्यांनी रसिकांना आत्मीक आनंद दिला. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव यांनी तर संवादिनीवर श्रीकांत पिसे यांनी दमदार साथ दिली. अविनाश घुशे व अपूर्वा घुशे यांनी गायक वादकांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.