‘तेरा रोम रोम हर हर बोले’ हे सुफी गीत सादर करून वातावरण भक्तीमय केले
नागपूर समाचार : सुफी हा भक्तीचा मार्ग असून त्यांला कोणत्याही जातीधर्माचे बंधन नाही. अध्ययन, प्रेम आणि समर्पण हे सुफीचे तीन तत्व असल्याचे सांगत प्रसिद्ध सुफी गायक गौरव चाटी यांनी हजरत अमीर खुसरो यांच्या ‘तेरा रोम रोम हर हर बोले’ हे सुफी गीत सादर करून वातावरण भक्तीमय केले.
अलगअँगल कम्युनिटी आर्ट सेंटर आणि बैठक, नागपूर यांच्या संयुक्तवतीने आयोजित ‘इंडिया म्युझिक फेस्ट – 2023’ च्या दुस-या दिवशी सुफी गायक गौरव चाटी यांनी उपस्थितांना सुफीगायनासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यांनी अली इमामे, लागे जिया में मोरे नैनवा के बाण रे अशी अनेक सुफी गीते सादर केली. तत्पूर्वी, बैठकतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांनी सादरीकरण केले. त्यांना यावेळी पुरस्कारही प्रदान करण्यात आले.
वैविध्यपूर्ण शैलीचे गायक, वादक, संगीत संयोजक कार्थिक सेकरण यांचे सादरीकरण झाले. गायक, गीतकार, कवी व वाद्यनिर्माते कविश सेठ यांनी भारतीय व पाश्चात्य संगीतावर आपले मत व्यक्त केले. त्यांनी तयार केलेल्या नुरी या वाद्याचे त्यांनी यावेळी सादरीकरणही केले.