10 हजार लोकांनी घेतला सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद
नागपुर समाचार : इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन आणि फार्मास्युटिकल सायन्स विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांच्या संयुक्तवतीने सुरू असलेल्या तीन दिवसीय 72 व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस मध्ये देशभरातून आलेल्या विद्यार्थी, प्राध्यापक, विविध कंपन्या सीईओ, शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष व पदाधिकारी अशा सुमारे 10 हजार लोकांनी सुप्रसिद्ध गायक जावेद अली व नितीन मुकेश यांच्या गीतांचा आनंद घेतला. दोन्ही गायकांनी सुमधूर व लोकप्रिय गाणी सादर करून उपस्थितांना थिरकायला लावले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात सुरू असलेल्या आयपीसी – 2023 मध्ये सहभागी झालेल्यांच्या मनोरंजनासाठी पहिल्या दिवशी जावेद अली यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट तर दुस-या दिवशी नितीन मुकेश यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती. दोन्ही दिवशी मुख्य हॉल खचाखच भरलेला होता.
जावेद अली यांनी श्रीवल्ली, कुनफाया, एक दिन तेरी राहों में, आंखो की गुस्ताखियां, चांद छुपा बादल में, धडकन, तु जो मिला, कहने को जश्न बहारा है अशी रॉकिंग गीते सादर करीत तरुणाईला खुश केले. नितीन मुकेश यांनी एक दिन मिट जाएगा, डम डम डिगा डिगा, क्या खूब लगती हो, जिना यहां मरना यहां अशी गाणी सादर करून मज्जा आणली. या तीन दिवसीय कॉंग्रेसदरम्यान परिसरात विद्यार्थ्यांनी गायन, वादन, नृत्य करून उपस्थितांचे मनोरंजनही केले.
स्थानिक आयोजन समितीचे अध्यक्ष अतुल मंडलेकर, असोसिएशन ऑफ फार्मास्युटीकल टिचर्स ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आयोजन समिती सचिव प्रा. मिलिंद उमेकर, संयोजन सचिव प्रा. प्रकाश इटनकर, समन्वयक डॉ. चंद्रकांत डोईफोडे, संयोजक डॉ. प्रमोद खेडेकर, मनोरंजन समितीचे अध्यक्ष डॉ. सतीश साखरखेडे यांच्या हस्ते कलाकार व त्यांच्या सहका-यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एसकेबी कॉलेज ऑफ सहायक प्राध्यापक नेहा राऊत व आरजे श्रुती यांनी केले.
म्युझिकल फाउंटेनचाही घेतला आनंद
इंडियन फार्मास्युटीकल कॉंग्रेससाठी देभरातील आलेले विविध फार्मा कंपन्यांचे सीईओ, संस्थांचे अध्यक्ष, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी यांनी फुटाळा तलावावरील म्युझिकल फाउंटेन अँड लाईटशोचा आनंद घेतला. एसीजी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. अजित सिंग, भारत बायोटेकच अध्यक्ष डॉ. कृष्णा इला, सिपेक्स इनकार्पोरेशनचे सीईओ प्रदीप गद्रे, ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्ययासह अनेकांचा त्यात समावेश होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला.