इंडियन फार्मास्युटीकल कॉंग्रेस – 2023 चा आज समारोप
नागपुर समाचार : कोविड काळात भारतीय फार्मा क्षेत्राने सर्वात आधी लस तयार केली, कच्चा माल तयार केला आणि देशभरात लसीचे वेगाने वितरण करून भारतीयांना मोफत लस उपलब्ध करून दिली. भारतीय लसीने केवळ भारतीयांचेच नाही तर 106 देशांतील लोकांचे प्राण वाचवले. संशोधन आणि निर्मिती अशा दोन्ही क्षेत्रात भारतीय फार्मा क्षेत्राने जगाला आपली शक्ती दाखवून दिली. फार्मा क्षेत्राचे हे कार्य अभिमानास्पद आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले.
इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन आणि फार्मास्युटिकल सायन्स विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांच्या संयुक्तवतीने आयोजित करण्यात आलेल्या 72 व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचा आज रविवारी थाटात समारोप झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनच्या परिसरातील मुख्य हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
औषधी क्षेत्रात देशाला अधिक संशोधनाची तसेच कच्च्या मालासंदर्भातील परावलंबित्व कमी करण्याची आज गरज आहे. कच्च्या मालाच्या निर्मितीसाठी ‘बल्क ड्रग पार्क’ तयार करण्यात येणार असून त्याकरिता महाराष्ट्रात जागेचा शोध सुरू आहे. औषधे व उपकरण निर्मितीसाठी इको सिस्टीम तयार करण्यात येणार आहे, असे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाला ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट्सचे अध्यक्ष जगन्नाथ एस. शिंदे, ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्नीकल एज्युकेशनचे सल्लागार डॉ. राजेंद्र काकडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, इंडियन हॉस्पिटल फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष टी. व्ही. नारायणा व वडलामुडी राव, पंकज बेक्टर, स्थानिक आयोजन समितीचे अध्यक्ष अतुल मंडलेकर, असोसिएशन ऑफ फार्मास्युटीकल टिचर्स ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आयोजन समिती सचिव प्रा. मिलिंद उमेकर, संयोजन सचिव प्रा. प्रकाश इटनकर, समन्वयक डॉ. चंद्रकांत डोईफोडे, संयोजक डॉ. प्रमोद खेडेकर यांची मंचावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर डोईफोडे यांनी केले तर ठराव वाचन टी. व्ही. नारायणा यांनी केले. सायंटिफिक रिपोर्टचे वाचन डॉ. दादासाहेब कोकरे यांनी व संयोजन डॉ. ब्रिजेश ताकसांडे यांनी केले. यावेळी सायंटिफिक पोस्टर प्रेझेंटेशन विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सूत्रसंचालन एसकेबी कॉलेज ऑफ फार्मसी कामठीचे प्रा. मनिष आगलावे व प्रा. नियामत चिमथानावाला यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. दिनेश बियानी, डॉ. नंदकिशोर कोटांगळे, डॉ. निशांत अवंडेकर, डॉ. रिता वडतकर, रश्मी बारापात्रे यांचे सहकार्य लाभले.
उत्कृष्ट ‘अॅबस्ट्रॅक्ट पोस्टर’ला पुरस्कार
72 व्या इंडियन फार्मास्युटीकल कॉंग्रेसमध्ये देशभरातून 3000 सायंटिफीक पोस्टर आले होते. त्यापैकी 2700 अॅबस्ट्रॅक्ट पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. तीन विभागात विभागण्यात आलेल्या या पोस्टर मधून उत्कृष्ट 80 पोस्टरची 80 तज्ञांच्या चमूद्वारे निवड करण्यात आली. त्यातून 57 विद्यार्थ्यांना ओरल प्रेझेंटेशनची संधी देण्यात आली. त्यातील उत्कृष्ट दहा सायंटिफीक पोस्टर विजेते विद्यार्थी अभिजीत विष्णू पुरी, रुपाली प्रसाद, अपूर्वा बनकर, किर्थीशिखा पी. हेमंत कन्हेरे, आकाश वाघोडे, पूजा तोडके, शांभवी इ. व गोवी पॅबस्टर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.
आयपीसी – 2023 मध्ये ठराव पारीत
- फार्मसी अॅक्ट – 1948 च्या कलम – 42 चे कठोर पालन व्हावे.
- फार्मसी प्रॅक्टीस रेग्युलेशनची अंमलबजावणी.
- औषधी संदर्भात प्रत्येक निर्णय प्रक्रियेत फार्मसिस्टला सहभागी करून घ्यावे.
- स्वतंत्र फार्मसी विभागासह फार्मसी सेवा व प्रशिक्षण संचालनालय स्थापन करावे.
- फार्मसिस्ट संवर्गातील पदनिर्मितीचे निकष पीसीआय आणि सरकारने निश्चित करावे.