नागपुर समाचार : सद्या सर्वत्र कोव्हिडचा प्रादुर्भाव वाढत आहे. नागपूर शहरही रेड झोनमध्ये आहे. अशा स्थितीत शहरातील कोणतिही शाळा सुरू करणे धोक्याचे ठरेल. कोरोनाच्या या काळात कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दखल घेतली जात आहे. मात्र यासाठी शाळा सुरू करण्यास परवानगी सद्यातरी नाही. त्यामुळे शाळांनी स्वत: ऑनलाईन शिक्षणासाठी ‘प्लॅटफॉर्म‘ तयार करून शाळा सुरू न करताही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार मनपा हद्दीतील शाळा सुरू करण्यासंदर्भात विशेषत: प्रतिबंधीत क्षेत्रातील शाळा सुरु करण्याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार मनपा आयुक्तांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार नवीन शैक्षणिक सत्र सुरू करण्यापूर्वी शाळांद्वारे करावयाच्या तयारीसंदर्भात गुरूवारी (ता.१८) मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील खासगी शाळा संचालक, सचिव व मुख्याध्यापकांशी व्हिडिओ कॉन्फर्न्सिंगद्वारे संवाद साधला. याप्रसंगी मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटर उपस्थित होत्या. शहरातील सुमारो एक हजार शाळांच्या प्रतिनिधींनी यावेळी मनपा आयुक्त यांच्याशी झालेल्या ऑनलाईन चर्चेत सहभाग घेतला.
आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, दरवर्षी २६ जूनला राज्यातील सर्व शाळा सुरू होतात. मात्र यावर्षी सर्वत्र कोव्हिडच्या संसर्गाचा धोका आहे. अशा स्थितीत शाळांमध्ये सद्यातरी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण देणे शक्य नाही. सर्व शाळांनी येत्या २६ जूनला शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेउन या बैठकीत शाळा सुरू करण्यापूर्वी करावयाची तयारी, शाळेच्या प्रसाधनगृहांची स्वच्छता, शाळा सुरू झाल्यानंतर घ्यावयाची काळजी, विद्यार्थ्यांची गर्दी होउ नये याकरिता करावयाचे नियोजन तसेच शाळा सुरु करणे व कशाप्रकारे चालू करणे, आदीबाबत विचार विनीमय करावा. शाळा सुरू करण्यापूर्वी प्रत्येक वर्गखोली, प्रसाधनगृह, दारे, खिडक्या सर्वांचे निर्जंतुकीकरण करावे. विद्यार्थ्यांना आधीच स्वच्छतेचे धडे देण्यात यावे. हात कसे धुवायचे, मास्कचा नियमीत वापर, सोशल डिस्टंसिंग कसे राखायचे आदीबाबत विद्यार्थ्यांना व पालकांना माहिती देणे या सर्व बाबींवरही बैठकीत सविस्तर चर्चा करावी, असेही ते म्हणाले.
कोव्हिडचा संसर्ग टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे. मात्र यामध्ये काही अडसर निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यानुसार अंदाजे इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या ५४ टक्के विद्यार्थ्यांकडे अँडरॉईड मोबाईल व सेट टॉप बॉक्ससह टिव्हीची व्यवस्था आहे. उर्वरित २२.४१ टक्के विद्यार्थ्यांकडे दोन्ही व्यवस्था नाही. इयत्ता सहावी ते आठवीच्या ६५ टक्के विद्यार्थ्यांकडे दोन्ही व्यवस्था आहे तर ३२ टक्के विद्यार्थी वंचित आहेत. माध्यमिक गटात इयत्ता ९ ते १२ वी च्या ७२ टक्के विद्यार्थ्यांकडे दोन्ही सुविधा आहेत तर २१.३७ टक्के विद्यार्थ्यांकडे नाहीत. अशा स्थितीत प्रत्येक शाळांमधील तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाशी जोडण्याचे आवाहन आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे हे अत्यंत महत्वाचे वर्ष आहे. या विद्यार्थ्यांसह इतरही विद्यार्थ्यांना ऑनलाईन व इतर दुरस्थ पद्धतीने शिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्था व स्वयंसेवकांचे सहकार्य घेण्याबाबत प्रयत्न सुरू आहे, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.
आजच्या स्थितीत विद्यार्थ्यांना शाळेपेक्षा शिक्षणाची जास्त गरज आहे. त्यादृष्टीने सर्व शाळा व्यवस्थापनाने प्रयत्न करावे. महाराष्ट्र शासनातर्फे ऑनलाईन शिक्षणासाठी विविध ‘प्लॅटफॉर्म’ उपलब्ध करून देण्यात येत आहेत. खासगी शाळांनीही एकमेकांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करून काही ‘प्लॅटफॉर्म’ निर्माण करता येतील का, याबाबत विचार करावा. शाळा सुरू करताना आधी प्राधान्याने इयत्ता ९ ते १२ चे वर्ग सुरू करावयाचे आहेत.
राज्यशासनाच्या परिपत्रकानुसार इयत्ता नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग जुलै, २०२० पासुन तर सहावी ते आठवी चे वर्ग ऑगस्ट २०२० पासून, तिसरी ते पाचवी चे वर्ग सप्टेंबर, २०२० पासून आणि इयत्ता दहावीच्या निकालाच्या आधारावर अकरावीचे वर्ग सुरु करता येईल. असे असले तरी कोव्हिड – १९ ची परिस्थीती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना टि.व्ही किंवा रेडीओवर उपलब्ध होणारे शैक्षणीक कार्यक्रम दाखविण्यासाठी किंवा ऐकविण्यासाठी पालकांना प्रवृत्त करावे.
कोव्हिड संदर्भातील दिशानिर्देशांचे पालन करून सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर पाठ्यपुस्तके उपलब्ध करण्याबाबत शाळांमार्फत कार्यवाही करण्यात यावी, असेही यावेळी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आवाहन केले.
मनपा आयुक्तांचे भाषणांचे प्रमुख मुददे
- सर्व शाळांनी २६ जून ला स्कूल मैनेजमेंट कमेटी ची मीटिंग बोलवावी आणि पालकांना कोव्हिड – १९ च्या दिशा निर्देशांची माहिती दयावी.
- सर्व शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरु करावे. जर शाळा सुरु करावी लागली तर सामाजिक अंतर ठेवून वर्ग घ्यावे लागतील. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी वर्ग घ्यावे. एका वर्गात २० पेक्षा जास्त विद्यार्थी नसावे. त्यातही सोशल डिस्टेसिंगचे पालन करावे. एका बेंचवर एकच विद्यार्थी असावा.
- जर शाळांकडे व्यवस्था नसली तर सम, विषय तारखांना एकेका वर्गाला शाळेत बोलवावे.
- महाराष्ट्र शासनाचे निर्देशाप्रमाणे नववी- दहावी आणि बारावी चे वर्ग जुलै मध्ये सुरु होईल. सहावीं ते आठवी पर्यंतचे वर्ग ऑगस्ट मध्ये सुरु होणार. तिसरी ते पाचवी पर्यंतचे वर्ग सप्टेंबर मध्ये सुरु होतील आणि पहली व दूसरी वर्ग सध्या सुरु करावयाचे नाहीत. असे असले तरी तेव्हाची कोव्हिड-१९ बाबतची परिस्थीती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल.
- शाळांनी लवकरात – लवकर विद्यार्थ्यांना पाठयपुस्तके उपलब्ध करुन घ्यावे. पाठयपुस्तके वाटप करीत असतांना विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन करावे तसेच पालकांना ऑनलाईन शिक्षणाबाबत माहिती दयावी.
- शाळांना दररोज सेनीटायइजेशन करावा लागेल. शाळेचा आवारात साबुण आणि पाणीची व्यवस्था करुन हाथ धुण्याची व्यवस्था करावी. सगळयांना त्रिस्तरीय मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. नाकाला, तोंडाला किंवा डोळयांना शक्यतो हात लावू नये. लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे.
- पूर्वीप्रमाणे आता ऑटोमध्ये एकापेक्षा जास्त विद्यार्थी बसू शकत नाही. बस मध्ये एक विद्यार्थी एका सीटवर बसू शकतो. चारचाकी मध्ये दोन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना परवानगी नाही आणि दुचाकी वाहनमध्ये पण एकच व्यक्तीला परवानगी आहे.
- कोव्हिड च्या प्रादुर्भाव असेल तरी शिक्षण योग्य प्रकारे देणे ही शाळा व्यवस्थापन, शिक्षक, पालक, शासन यांची जबाबदारी आहे.
- शाळांनी पालकांना एकाचवेळेस शुल्क भरण्यास जबरदस्ती न करता त्यांच्या आर्थिक परीस्थीतीचा विचार करुन त्यांचेकडून टप्प्या-टप्प्याने शुल्क वसूल करावे.