ग्रंथ प्रदर्शनातील गाळ्यांसाठी सोमवारी झाली आभासी सोडत; 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
वर्धा समाचार : विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने वर्धा येथे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनात 2 ते 5 फेब्रुवारी 2023 दरम्यान भव्य असे ग्रंथप्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या दालनाला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथनगरी’ असे नामकरण करण्यात आले आहे. या ग्रंथप्रदर्शनातील गाळ्यांसाठी सोमवारी आभासी पद्धतीने सोडत पार पडली.
विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात झालेल्या या सोडतीमध्ये महाराष्ट्रातील विविध प्रकाशन संस्थांच्या काही प्रतिनिधींनी ऑनलाईन तर काहींनी प्रत्यक्ष उपस्थिती लावली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथप्रदर्शन समितीचे समन्वयक नरेश सबजीवाले यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या सोडतीला साहित्य संमेलन आयोजन समितीचे समन्वयक व विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, आयोजन समितीचे कार्यवाह विलास मानेकर, कोषाध्यक्ष विकास लिमये व सदस्य प्रदीप मोहिते यांची उपस्थिती होती.
ग्रंथप्रदर्शनामध्ये एकुण 290 ग्रंथदालने राहणार आहेत. त्यातील 260 दालने पुस्तक विक्री व प्रदर्शनासाठी राहणार असून उर्वरित 30 दालने आयोजन समितीसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यापैकी एकुण 250 दालनांची सोमवारी सोडत पार पडली. त्यात चार, तीन, दोन व एक गाळ्यांसाठी नोंदणी केलेल्या प्रकाशकांना गाळे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र, दिल्ली, गोवा येथून विविध प्रकाशन संस्थांनी गाळ्यांसाठी नोंदणी केली आहे. त्यात राजहंस, मॅजेस्टिक, मौज, पॉप्युलर, मेहता, रोहन, दिलीपराज, साधना इत्यादी महत्वाच्या प्रकाशन संस्थांचा समावेश आहे.
दिनांक, 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष श्री. भारत सासणे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. मनोरंजनापासून ते दर्जेदार वाडमयीन पुस्तकांपर्यंत सर्व प्रकारचे ग्रंथ वाचकांना येथे उपलब्ध राहणार आहेत. वाचकांनी या ग्रंथप्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
संमेलन परिसरात ग्रंथदालन व इतर दालनांच्या सुरक्षेची काटेकोर यंत्रणा उभारण्यात येणार आहे. प्रकाशकांच्या अडचणींचेदेखील वेळोवेळी निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आयोजकांनी कळवले आहे.