- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : वर्धेच्‍या ऐतिहासिक भूमीवर मिळाले विचारांचे अमृत – नितीन गडकरी

96 व्‍या अ. भा. मराठी साहित्‍य संमेलनाचा थाटात समारोप; दहा ठराव झाले मंजूर 

वर्धा समाचार : राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी, विनोबा, जमनालाल बजाज, सिंधूताई सपकाळ, पांडूरंगजी खानखोजे यांची पवित्र भूमी असून या वर्धेच्‍या ऐतिहासिक भ‍ूमीवर साहित्‍य संमेलनाच्‍या निमित्‍ताने लोकांना विचारांचे अमृत मिळाले आहे. हे विचार समाजाला नवी दिशा नक्‍की देतील, असे विचार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्‍यक्‍त केले.

विदर्भ साहित्‍य संघाच्‍या शताब्‍दी वर्षानिमित्‍त विदर्भ साहित्‍य संघ आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्‍य महामंडळाच्‍या वर्धा येथे तीन दिवसांपासून सुरू असलेल्‍या 96 व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचा आज रविवारी थाटात समारोप झाला. राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी साहित्‍यनगरी, स्‍वावलंबी शिक्षण मंडळाचे पटांगण, बॅचलर रोड, वर्धा येथील आचार्य विनोबा भावे सभामंडपात झालेल्‍या या समारोपीय कार्यक्रम व खुल्‍या अधिवेशनाला केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांची विशेष उपस्‍थ‍िती लाभली. संत वाडमयाचे अभ्‍यासक ज्‍येष्‍ठ साहित्यिक डॉ. म. रा. जोशी व अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्‍यक्ष राजीव बर्वे यांचा नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.

संमेलनाध्‍यक्ष न्‍यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, स्‍वागताध्‍यक्ष मा. श्री. दत्‍ताजी मेघे, आ. पंकज भोयर, अ. भा. मराठी साहित्‍य महामंडळाच्‍या अध्‍यक्ष उषा तांबे, विदर्भ साहित्‍य संघाचे कार्याध्‍यक्ष प्रदीप दाते, सरचिटणीस विलास मानेकर, महामंडळाचे उज्‍ज्‍वला मेहेंदळे, सागर मेघे यांची उपस्‍थ‍िती होती.

नितीन गडकरी यांनी विदर्भ साहित्‍य संघाचे माजी अध्‍यक्ष स्‍व. मनोहर म्‍हैसाळकर यांच्‍या आठवणींना उजाळा दिला व त्‍यांना श्रद्धांजली अर्पण केली. सर्वांच्‍या सहभागामुळे हे संमेलन यशस्‍वी झाल्‍याचे ते म्‍हणाले.

साहित्‍य, संस्‍कृतीतून समाज बदलत असतो, घडत असतो. भविष्‍यातील समाजाची दिशा ही साहित्‍यातून प्रतिबिंबित होत असते. राष्‍ट्रीय व सामाजिक जीवनात शिक्षण, आरोग्‍य, उद्योग, विकास क्षेत्र महत्‍वाचे असते तसे साहित्‍याचे क्षेत्रही महत्‍वाचे असते, असे सांगताना नितीन गडकरी म्‍हणाले, भविष्‍यात साहित्‍य, काव्‍य, सादरीकरणाच्‍या पद्धतीत अनेक बदल होणार असून ज्ञानेश्‍वरी, ग्रामगिता, गजानन महाराजांची पोथी यांना डिजिटल करण्‍याचे प्रयत्‍न सुरू आहेत. येणा-या काळात तंत्रज्ञानाचा वापर करून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले जाऊ शकतात.

म. रा. जोशी यांनी सत्‍काराला उत्‍तर देताना विदर्भ देशात प्रचंड साहित्‍य, शीलालेख, ताम्रपटातून आद्य मराठीचा शोध घेतला जाऊ शकतो, असे सांगितले. राजीव बर्वे यांनी मुलांसाठी प्रकाशित केलेली सचित्र पुस्‍तके शासनाने शाळांपर्यंत पोहोचवण्‍यासाठी ग्रँड परत एकदा सुरू करावी, तसेच, शासनाच्‍या निरूपयोगी जागा ग्रंथप्रदर्शनासाठी द्यावा, अशी मागणी केली. 

साहित्‍य संमेलनाच्‍या आयोजनात महत्‍वाची भूमिका बजावणारे वर्ध्‍याचे जिल्‍हाधिकारी राहूल कर्डिले, अभियंते महेश मोकलकर, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, मुरलीधर बेलखोडे, हरिश इथापे, आशिष पोहाने, प्रकाश पागे, किरण सगर, प्रा. मिलिंद जोशी, श्रीमती चपळगावकर, प्रकाश पायगुडे, प्रकाश होळकर, पुरुषोत्‍तम सप्रे, अ. के. आकरे, विद्या देवधर, अॅड. प्रमोद आडकर, बाळासाहेब देशमुख, रंजना दाते, प्रकाश गर्गे, प्रा. सतीश तराळ, गजानन नारे, संजय इंगळे तिगावकर, नरेंद्र पाठक, डॉ. रविंद्र शोभणे, हेमचंद्र वैद्य, सुभाष पाटणकर यांचा सत्‍कार करण्‍यात आला. राहूल तेलरांधे यांनी नितीन गडकरी यांना तैलचित्र भेट दिले. संमेलनाचे अहवाल वाचन प्रदीप दाते यांनी केले तर ठराव वाचन उज्‍ज्‍वला मेहेंदळे यांनी केले. उषा तांबे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. 97 व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या आयोजनासाठी इच्‍छूक असणा-या संस्‍थांनी 15 एप्रिल 2023 पर्यंत पत्र पाठवावे, असे आवाहन त्‍यांनी केले. सीमा रोठे – शेटे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. गजानन नारे यांनी आभार मानले. 

नव्‍या प्रतिभांचा हुंकार – न्‍यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर

नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, अरविंद जगताप, किशोर कदम ‘सौमित्र’ ही कलावंत मंडळी साहित्‍य संमेलनात आली. त्‍यांच्‍यानिमित्‍ताने नव्‍या प्रतिभेचे हुंकार साहित्‍य संमेलनता येत आहे, त्‍यांचे स्‍वागत केले पाहिजे, असे संमेलनाध्‍यक्ष न्‍यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर म्‍हणाले. सांहित्‍य संमेलने जितक्‍या कमी खर्चामध्‍ये करता येतील तेवढी ती केली पाहिजे. एकमेकांना भेटण्‍याची, विचारांचे आदानप्रदान करण्‍याची संधी त्‍यामुळे प्राप्‍त होते, असे ते म्‍हणाले. मतभेद असतील तरी साहित्‍याचा विचारांचे आदानप्रदान होत नाही. त्‍यामुळे विद्रोही साहित्‍य संमेलनाला भेट दिली. सर्वांनी अशी उदारता शिकली पाहिजे. चांगली मासिके, नियतकालिक ही उदारता शिकवतात, असे ते म्‍हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *