- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : ‘माहेर’ शब्‍दातून व्‍यक्‍त होते प्रेम, आपुलकी – शांताक्‍का

सेवासदनमध्‍ये रंगला माजी विद्यार्थ्यांचा ‘माहेर मेळावा’ 

नागपूर समाचार : ‘माहेर’ या शब्दामधूनच प्रेम,आत्मीयता, आपुलकीची भावना व प्रचंड आनंद मिळतो असे विचार सेवासदन मधील माहेर मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी तथा राष्ट्र सेविका समितीच्या संचालिका श्रीमती शांताक्का यांनी व्यक्त केले. 

सेवासदन शिक्षण संस्थेमार्फेत मागील दहा दशकांपासून संचालित विविध विभागातील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंम्मेलन म्हणजे माहेर मेळाव्याचे आयोजन आज सीताबर्डी येथील संस्थेच्या परिसरात करण्यात आले होते. शालेय विषयाच्या अध्यापनाबरोबरच भारतीय विद्या, संस्कृती व जीवनमूल्य देऊन आदर्श नागरिक घडवणारी संस्था म्हणजे सेवासदन असे गौरवोद्गार श्रीमती शांताक्का यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी संस्थेचे उपाध्यक्ष बापू भागवत होते. त्‍यांनी ‘माहेर मेळावा’ ही संकल्पना उलगडून दाखवली.

ध्वनीचित्रफितीद्वारे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कांचन गडकरी यांनी माजी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले तथा संस्थेच्या शताब्दी वर्षातील कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सचिव श्रीमती वासंती भागवत यांनी केले तर उद्घाटन समारंभाचे संचालन व अतिथी परिचय श्रीमती आरती गाडबैल यांनी केले. ध्येय गीत श्रीमती राजश्री पिंपळघरे व श्रीमती अनघा दीक्षित यांनी सादर केले. उद्घाटनीय समारंभाचे आभार डॉ. मंजिरी पाठक यांनी मानले.

दिवसभर चाललेल्या या माहेर मेळाव्यामध्ये बौध्दिक, क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. हे सर्व माजी विद्यार्थी 20 ते 80 वय वर्ष या वयोगटातील होते .या सर्वांना स्मृतिचिन्ह प्रदान करून संस्थेतर्फे सन्मानीत करण्यात आले. या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी सेवासदन संस्थेबद्दल स्वानुभव व्यासपीठावरून व्यक्त केले. 

या माहेर मेळाव्याच्या समारोपा प्रसंगी जेष्ठ निरूपणकार व विचारवंत श्री विवेकजी घळसासी यांनी माहेरच्या मातीतील प्रत्येक कण हा मायेच्या मायेची आठवण करून देतो असे मत व्यक्त केले. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. समय बनसोड यांनी संस्थेच्या शताब्दी वर्षातील महोत्सवाच्या पूर्वतयारीची व संस्थेच्या भविष्यातील प्रकल्पांची माहिती दिली. माहेर मेळाव्याच्या समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा तिवारी तर परिचय व पुरस्कार वाचन प्रा.उषा पाटील यांनी केले.

वैयक्तिक गीत बाळकृष्ण गड्डमवार यांनी म्हटले तर कार्यक्रमातील उपस्थिताचे आभार सहसचिव डाॅ. कल्पना तिवारी(उपाध्याय) यांनी मानले. राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त माजी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या सचिव वासंती भागवत, संस्था उपाध्यक्ष बापू भागवत व साधना हिंगवे, कार्यकारिणी सदस्य,आजीव सभासद मंडळाच्या कार्यवाह डाॅ. मंजिरी पाठक, संस्थेच्या विभागातील सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सातशेच्या वर माजी विद्यार्थिंनी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *