महाराष्ट्र समाचार : देशाची अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत पाच लाख कोटी डॉलर करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्राची भूमिका निर्णायक ठरणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राज्याच्या आर्थिक सल्लागार समितीची पहिली बैठक काल मुंबईत झाली.
त्यानंतर बातमीदारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगतलं की महाराष्ट्र हे देशातलं, सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारं राज्य आहे. पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट देशाला गाठता यावं, यादृष्टीनं महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.
सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून राज्याच्या सर्वांगीण विकासाकरता स्थापन केलेली आर्थिक सल्लागार परिषद ही राज्याच्या दृष्टीनं क्रांतीकारक पाऊल असून, राज्याला सर्वांगीण विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण आहे. या बैठकीत शेती उत्पादनवाढ, पारंपरिक शेती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, वित्त पुरवठा, राज्याची-जिल्ह्यांची क्षमता वाढ, रोजगार निर्मिती, दरडोई उत्पन्न वाढवणं, कौशल्य विकास या सर्वच बाबींवर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, परिषदेचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर, यांच्यासह परिषदेचे २१ सदस्य बैठकीला उपस्थित होते.
अध्यक्ष चंद्रशेखर यांनी आर्थिक विकासाच्या दृष्टिकोना संदर्भात सादरीकरण केलं. तर, सदस्यांनी आपली मतं, सूचना मांडल्या. सदस्यांनी केलेल्या सूचनांवर आधारित, विकासाचा रोड मॅप तयार केला जाईल, आणि कालबद्ध पद्धतीनं त्याची अंमलबजावणी केली जाईल, असं फडनवीस यांनी सांगितलं.