नागपूर समाचार : केंद्र सरकारचे कृषी कल्याण मंत्रालय, विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा मिलेट एक्शन ग्रुप आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ़ वुमन, चाइल्ड एंड यूथ डेवलपमेंट च्यावतीने व्हीएनआयटीच्या प्रांगणात आयोजित दोन दिवसीय श्री अन्न अधिवेशनाच्या समारोपीय सत्रात भरडधान्य पोषण आहाराला गतवैभव प्राप्त करून देण्यासंदर्भात सात महत्त्वाचे ठराव घेण्यात आले. हे ठराव केंद्रीय कृषी मंत्रालयासोबतच सार्वजनिक अन्न पुरवठा मंत्रालयालाही सादर केले जाणार असून त्यामाध्यमातून भरडधान्याचा समावेश शिधापत्रिका (रॅशनकार्ड) स्तरावर करता यावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
समारोपीय कार्यक्रमाला वसंतराव नाईक राज्य विस्तार व्यवस्थापन संस्था (वनामती)च्या संचालिका मित्ताली सेठी प्रमुख पाहुण्या होत्या. व्यासपीठावर व्हीएनआयटीच्या केमिकल इंजिनिअरिंग विभाग अध्यक्ष डॉ. सचिन मांडवगणे, युसीडचे राजेश मालविय, कापूस विकास परिषदेचे संचालक डॉ. ए. एल. वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते.
धोरणे राबविणाऱ्यांनी जमिनीवरील वास्तविकता समजून घेतली पाहिजे, असे नमूद करीत मिताली सेठी म्हणाल्या, भारतीय संस्कृतीत भरडधान्याचा समावेश होता. मात्र जागतिकीकरणाच्या ओघात तो मागे पडला. याचे आहारातील महत्त्व पटवून देण्यासाठी निर्णय प्रक्रियेतील प्रत्येक घटकाला एकाच व्यासपीठावर आणणे गरजेचे आहे.
डॉ. वाघमारे म्हणाले, भरडधान्याचा वितरण व्यवस्थेत समावेश करण्यासंबंधी सरकारने कापूस विकास संस्थेवर नोडल संस्थाम्हणून जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे जमिनीवर काम करणाऱ्यांचे प्रस्ताव सरकारदरबारी मांडले जातील.
सरकारी, उपक्रम, कार्यालये आणि शैक्षणिक स्तरावरील उपहारगृहांमध्ये मिळणाऱ्या अन्न पदार्थांमध्ये भरडधान्य पोषण आहाराचा समावेश केला तर त्याला राजाश्रय मिळेल, असे मत यावेळी राजेश मालवीय यांनी व्यक्त केले.
व्हीएनआयटी राबविणार एक्शन प्लान
देशभरातील 242 हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजशी टायअप करून व्हीएनआयटी लवकरच एक श्री अन्न (भरडधान्य) रेसिपीचे मॉडेल विकसित करणार आहे. थिंक इंडिया या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशभरातील भरडधान्य रेसिपीचे एकत्रिकरण करून त्याचे पुस्तक रुपात प्रकाशन केले जाणार असून येत्या जागतिक महिला दिनी व्हीएनआयटीमध्ये मिलेट रेसिपी स्पर्धा घेणार आहे.
व्हीएनआयटीच्या ‘मिलेट मिक्स’ ला वाढती मागणी; अन्न खाद्यपदार्थांचा विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद
विश्वेश्वय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी) च्या संशोधकांनी तयार केलेल्या ‘मिलेट मिक्स’ ला मागणी वाढली असून त्यापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या श्री अन्न खाद्य उत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नालॉजी तंजावूर मधून फूड प्रोसेसिंग इंजीनियरिंग मधे पीएचडी घेतलेल्या तसेच, सध्या व्हीएनआयटीमध्ये मेरीनो इनोव्हेशन सेंटरमध्ये सायंटीफीक ऑफीसर म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. श्वेता देवतळे यांनी ज्वारी, बाजरी आणि रागी हे प्रमुख भरडधान्य आणि कोडो, कुटकी, कंगणी, राळा आणि सावा या उपमुख्य भरडधान्यापासून दोन प्रकारचे मिलेट मिक्स तयार केले आहेत.
यातील एक मिक्स गोड पदार्थांमध्ये वापरण्यायोग्य असून दुसरे मिक्स खा-या पदार्थांमध्ये वापरले जाते. डॉ इप्सिता चक्रवर्ती व प्रफुल्ल दाढे यांच्या मदतीने त्यांनी ‘कृषी अॅग्रोटेक (क्रिएट)’ नावाने एक स्टार्टअप सुरू केले असून त्यामाध्यमातून हे ‘मिलेट मिक्स’ समीधा न्यूट्रीफूडच्या ब्रँडनेम अंतर्गत ऑनलाईन व ऑफलाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
डॉ. श्वेता देवतळे म्हणाल्या, या मिलेट मिक्स मध्ये मोठ्या प्रमाणात प्लाण्ट प्रोटीन्स असून कोणत्याही गोड व खा-या पदार्थाचे पोषण मूल्य ३0 टक्क्यांनी वृद्धींगत करण्याची त्यात क्षमता आहे. दूध, लाडू, स्मुदी, कप केक, पुरण पोळी, मोदक, खीर, शीरा, शंकरपाळे अशा गोड पदार्थांचे तसेच, चकली,सांबारवडी, इडली, दोसा, आप्पे, सांभार वडा, साबुदाणा वडा, उपमा, पकोडे, पुरी, पराठे, थालीपीठ, ऊकडपेंडी, अशा खारे पदार्थ या मिलेट मिक्समुळे अधिक पौष्टीक होतात.
मिलेट मिक्सयुक्त पदार्थांचा खाद्य उत्सव बुधवारी व्हीएनआयटी परिसरात आयोजित करण्यात आला होता. या खाद्यउत्सवातील पदार्थांचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला. अनेक फूड उद्योगामधील उद्योजकांनीदेखील या उत्सवाला भेट दिली.