नागपूर समाचार : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांच्या चमूने सादर केलेल्या ‘मोरूची मावशी’ या विनोदी नाटकाने रसिकांचे भरपूर मनोरंजन केले. जे. आर. शॉ ऑडिटोरियम, आयएमए येथे झालेल्या या दोन अंकी नाटकाला रसिकांची भरघोस उपस्थिती लाभली.
आचार्य प्र. के. अत्रे यांच्या लेखनीतून उतरलेल्या ‘मोरूची मावशी’ या विनोदी नाटकाचा प्रयोग रविवारी आयएमएच्या चमूने सादर केला. या नाटकाची निर्मिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रकाश देव व मानद सचिव डॉ. समीर जहागीरदार यांनी केली होती तर दिग्दर्शन रमेश लखमापुरे यांचे होते. डॉ. वैदेही नाईक, डॉ. आशीष थूल, डॉ. स्नेहल जोशी, डॉ. प्राची महाजन, डॉ. अभय आगाशे, डॉ. निलेश महात्मे, डॉ. संजय देशपांडे, डॉ. श्वेता देऊळकर, डॉ. प्रशांत भांडारकर व डॉ. समीर जहागीरदार यांच्या यात भूमिका होत्या. रसिकांनी डॉक्टर कलाकारांच्या अभिनयाला उत्स्फूर्त दाद दिली.
मध्यंतरात नाटकाच्या निर्मितीत महत्वपूर्ण योगदान देणा-या डॉ. मंजुषा गिरी डॉ. मंजुषा मार्डीकर यांच्यासह सर्व कलाकार, दिग्दर्शक, तांत्रिक सहायक या सर्वांचा आयएमएचे माजी महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. मिलिंद नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उदय गुप्ते यांनी केले. आयएमएतर्फे सप्तकच्या पदाधिका-यांचे आभार मानण्यात आले.