विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबवणार
नागपूर समाचार : स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रातील आघाडीच्या संस्था असलेल्या स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या नागपुरातील महिला महाविद्यालयासोबत दिल्लीच्या सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग (सीसीआरटी) ने सामंजस्य करार केला आहे.
सीसीआरटीचे संचालक ऋषी वशिष्ठ आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व महिला महाविद्यालयाचे संचालक रविंद्र फडणवीस यांनी या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी सीसीआरटीचे अध्यक्ष डॉ. विनोद इंदूरकर, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वंदना भागडीकर यांची उपस्थिती होती.
शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आदिवासी क्षेत्रातील मुलींच्या एकल विद्यालयांना अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे. सीसीआरटी ही संस्था भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेली स्वायत्त संस्था असून शिक्षणाला संस्कृतीशी जोडण्याचे काम करते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी भारतीय कला आणि संस्कृतीवर सैद्धांतिक शैक्षणिक कार्यक्रम राबविण्याचे काम ही संस्था करते. सीसीआरटीच्या सहकार्याने लवकरच महिला महाविद्यालयामध्ये नियमित कार्यशाळा, चर्चासत्र, कला व हस्तकला महोत्सवांचे आयोजन केले जाणार आहे.