मराठी राजभाषा दिनानिमित्त वि.सा.संघ ग्रंथालयातर्फे आयोजन
नागपूर समाचार : मराठी राजभाषा दिन अर्थात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथालयातर्फे मंगळवार, दि . २८ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रजांच्या लोकप्रिय व गाजलेल्या नाटयगीतांचा ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ हा सुरेल कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात मंगळवार दि. २८ फेब्रुवारी रोजी सायं ५.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाची संकल्पना ग्रंथालय संचालक प्रा. विवेक अलोणी यांची आहे.
या कार्यक्रमात खाजगी दूरचित्रवाणीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमातील नागपूरच्या गायिका भाग्यश्री टिकले आणि ज्येष्ठ गायक गुणवंत घटवाई हे नाटयगीते सादर करणार आहेत. तबलासंगत डॉ. राजेन्द्र डोळके यांची असून विजय बोरीकर हे संवादिनीसंगत करणार आहेत. निवेदन सना पंडीत यांचे आहे.
या कार्यक्रमाला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष श्री प्रदीप दाते यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नाटयसंगीत प्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.