नागपूर समाचार : टॉडलर टिचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्यावतीने येत्या, ४ ते 5 मार्च २०२३ रोजी दरम्यान कस्तुरबा भवन, १६५, बजाजनगर येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान एका आगळ्या – वेगळ्या ‘क्रिएटोफोरा’ प्रदर्शनाचे तसेच, विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात बालशिक्षण संबंधातील शिक्षक व जाणकारांच्या कल्पकतेतून निर्मित अनेक साधने व साहित्य प्रदर्शित करण्यात येणार आहेत. शिवाय, विविध विषयांवरील कार्यशाळांच्या माध्यमातून निष्णात समुपदेशक व तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शनदेखील लाभेल.
४ तारखेला सकाळी 10.30 वाजता ‘क्रिएटोफोरा’प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून दुपारी १२ वाजता मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशक पूनम मेनारिया यांचे ‘इमोशनल अँड मेंटल वेल बिइंग’ विषयावर व्याख्यान होणार आहे. ५ मार्चला दुपारी १२ वाजता बी सॉर्टेडच्या संस्थापिका सोनल फुके यांचे ‘द सिक्रेट ऑफ क्रिएटींग अॅन इमोशनली सेफ अँड वेल नरीश्ड चाईल्ड’ विषयावर मार्गदर्शन तर दुपारी ४ वाजता बालगोकुलमच्या संस्थापिका व शिक्षणतज्ञ ओजस्विनी जामदार यांचे ‘हाऊ टू चुज द बेस्ट प्री-प्रायमरी स्कूल फॉर देअर चाईल्ड’ विषयावर व्याख्यान होईल.
प्रदर्शन व कार्यशाळा सर्वांसाठी खुले असून 3 ते 8 वर्षे वयोगटातील पाल्य, पालक, बालशिक्षण क्षेत्रातील शिक्षकांनी व तज्ञांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन टॉडलर टिचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या संस्थापिका अवंती जोधपूरकर यांनी केले आहे.