- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपूर समाचार : अग्नीवीर भरतीमध्ये आता लेखी परीक्षेनंतर शारीरिक चाचणी

जिल्हाधिका-यांची पत्रकार परिषदेत माहिती

नागपूर समाचार : अग्नीवीर सैन्यदल भरतीसाठी पूर्वी शारीरिक चाचणी व त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जायची. मात्र, यंदाच्या भरती प्रक्रियेत आधी लेखी परीक्षा आणि त्यानंतर शारीरिक चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी दिली.

अग्नीवीर भरती संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. इटनकर बोलत होते. यावेळी नागपूर येथील सैन्यदल भरती केंद्राचे कर्नल आर.जगथ नारायण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर उपस्थित होते.

अग्नीवीर भरती ऑनलाईन अर्ज प्रक्रिया www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नावनोंदणी 16 फेब्रुवारी ते 15 मार्च, परीक्षा 17 एप्रिल ते 4 मे आणि निकाल 20 मे रोजी घोषीत होणार आहेत.           

विदर्भातील नागपूर, वर्धा, वाशीम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला व यवतमाळ या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. या पदभरतीच्या माध्यमातून अग्निवीर (जनरल ड्युटी), अग्निवीर (टेक्निकल), अग्निवीर (क्लर्क / स्टोअर किपर टेक्निकल), अग्निवीर ट्रेडसमन दहावी पास, अग्निवीर ट्रेडसमन आठवी पास ही पदे भरली जाणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील तरुणांना औरंगाबाद येथील भरतीमध्ये सहभागी होता येणार आहे. पाच जुलै ते 11 जुलैदरम्यान रॅलीचे आयोजन करण्याचे नियोजन आहे. सैन्यदलाच्या माध्यमातून देशसेवेची संधी मिळणार आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेत अधिकाधिक तरुणांनी अर्ज करीत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी यावेळी केले.

नागपूर येथील सैन्यदल भरती केंद्राचे कर्नल आर.जगथ नारायण यांनीही यावेळी भरती प्रक्रियेविषयीची माहिती दिली. गेल्यावर्षी नागपूर जिल्ह्यात झालेल्या भरतीमध्ये साठ हजार तरुण सहभागी झाले होते. यापैकी सुमार एक हजार युवकांची अग्निवीर भरतीमध्ये निवड करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यंदाच्या भरतीसाठी आतापर्यंत सुमारे पाच हजार तरुणांनी नावनोंदणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

विदर्भातील सर्व जिल्ह्यातील (बुलढाणा वगळून) जास्तीत जास्त युवकांनी या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा व आपली ऑनलाईन नावनोंदणी वेळेच्या आत करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *