- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपूर समाचार : जोडीदाराकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देणारे नाटक ”मी, स्वरा आणि ते दोघं”

ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ, ज्येष्ठ अभिनेते विजय पटवर्धन, अभिनेते सुयश टिळक आणि अभिनेत्री रश्मी अनपट यांनी साधला संवाद 

नागपूर समाचार : एकदंत क्रियेशन्स निर्मिती आणि आदित्य मोडक लिखित ”मी, स्वरा आणि ते दोघं ” या नाटकाच्या माध्यमाने आपल्या जोडीदाराकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे नाटकाच्या चमूने सांगितले. आयुषात वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटणारे व्यक्ती आणि त्यांच्या सोबत जुळणारे नाते याबाबत असलेल्या ”मी, स्वरा आणि ते दोघं ” या नाटकाचा प्रयोग येत्या शनिवारी दिनांक 18 मार्च 2023 रात्री 9 वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, सिविल लाईन्स येथे सादर होणार आहे. त्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ,ज्येष्ठ अभिनेते विजय पटवर्धन,अभिनेते सुयश टिळक आणि अभिनेत्री रश्मी अनपट यांनी नागपुरात संवाद साधला. 

आपल्यावर मनापासून निस्वार्थी प्रेम करणारं माणूस सापडायला मोठं भाग्य लागतं. अशी व्यक्ती प्रत्येकाला भेटतेच असे नाही; आणि भेटलीच तरी वयाच्या कोणत्या टप्प्यात भेटेल ह्याचा नेम नाही. पण समोरच्याने आपल्यावर केलेल्या प्रेमाला ओळखून त्याचा आदर केला, तर ते नातं अधिक बहरतं. तसेच नात्यात एकमेकांना समजून घेण्याची मॅच्युरिटी असली की, ते तुटण्याचा प्रश्नच नसतो. ‘मी, स्वरा आणि ते दोघं’ हे नात्यांकडे आणि पर्यायाने आपल्या जोडीदाराकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देणारे नाटक असल्याचे अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सांगितले. हे नाटक नात्याचे विविध पैलू मांडते असेही त्या म्हणाल्या.

दर्जेदार कथा आणि अभिनय यासाठी आवर्जून नाटक बघण्याचे आवाहन रसिक प्रेक्षकांना श्री सिद्धिविनायक पब्लिसिटीचे समीर पंडीत यांच्या तर्फे करण्यात आले आहे. 

Synopsis : स्वरा (रश्मी अनपट) ही शिकली सवरलेली, चांगल्या कुटुंबात मोठी झालेली, आणि स्वतःच्या पायांवर उभी असलेली मुलगी वडिल गेल्यावर आई मंजुषासोबत (निवेदिता सराफ) राहत असते. वैयक्तिक आयुष्यात स्वरा कोणाचेही प्रेम मिळण्याच्या बाबतीत कमनशीबीच असते. ह्याउलट, तिची आई स्वराचे वडिल मिस्टर रानडे गेल्यावर नव्याने आयुष्याकडे बघायला शिकतेय. कर्मधर्मसंयोगाने तिचा कॉलेजचा मित्र यशवंत पाटील (विजय पटवर्धन) तिला पुन्हा एकदा भेटतो. इथे प्रेमाच्या बाबतीत सतत अपयशी ठरलेल्या स्वराच्या आयुष्यात ऑफीसमधला मित्र कपिल (सुयश टिळक) नव्याने प्रेमाची आस घेऊन येतो. ह्या सगळ्यात मंजुषाला स्वरासोबत स्वत:च्या आयुष्याची घडीही नीट बसवायची असते. पुढे त्या चौघांच्या आयुष्यात काय घडते, हे कळण्यासाठी तुम्हाला ‘मी, स्वरा आणि ते दोघं’ हे नाटक बघायला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *