- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपूर समाचार : सी-20 आयोजनासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण; विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

नागपूर समाचार : शहरात येत्या 20 ते 22 मार्च दरम्यान होणाऱ्या सी-20 परिषदेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. आयोजनाबाबत प्रशासनाच्या विविध विभागांची आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आढावा बैठक घेतली. सी-20 च्या निमित्ताने शहराला जागतिक दर्जाचे आयोजन करण्याची संधी मिळत असून सर्व प्रशासकीय यंत्रणानी हे आयोजन यशस्वीपणे पार पाडण्याच्या सूचनाही श्रीमती बिदरी यांनी केल्या.

 विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,मनपा आयुक्त राधाकृष्ण बी,नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आदी उपस्थित होते.

जी-20 परिषदेंतर्गत नागपुरात होत असलेल्या सी-20 या जागतिक दर्जाच्या आयोजनासाठी प्रशासनाच्या विविध विभागांनी आपापल्या सज्जतेची माहिती बैठकीत दिली. सर्व संबंधित यंत्रणांनी जबाबदाऱ्या नेटकेपणाने पार पाडण्याच्या सूचना देत प्रशासनाने केलेल्या तयारी विषयी श्रीमती बिदरी यांनी समाधान व्यक्त केले. 

तत्पूर्वी, जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. सी-20 परिषदेच्या आयोजनाबाबत जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांच्या सज्जतेबाबत त्यांनी यावेळी माहिती घेतली व संबंधितांना आवश्यक सूचना केल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सी-20 परिषदेच्या प्रतिनिधींचे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत व नियोजित ठिकाणी प्रस्थान होण्याच्या दृष्टीने चोख व्यवस्था पार पाडण्यासाठी शनिवारी 18 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता रंगीत तालीम घेण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणांना दिल्या. डॉ इटनकर यांच्या नेतृत्वात ही रंगीत तालीम पार पडणार आहे.

दरम्यान, 19 मार्च रोजी सायंकाळपासून परदेशी व भारतीय प्रतिनिधींचे या परिषदेसाठी शहरात आगमन होणार आहे. 20 मार्च रोजी दुपारी रॅडिसन ब्लु हॉटेलमध्ये सामाजिक तथा अध्यात्मिक नेत्या माता अमृतानंदमयी यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सी-20 परिषदेचे उद्घाटन होणार आहे.

सी-20 साठी तयार करण्यात आलेल्या अजेंड्यासह जगभरातील स्वयंसेवी संस्थांसमोरील आव्हाने व त्यावरील उपाय याबाबत या परिषदेत चर्चा व मंथन होणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत 21 मार्च रोजी या परिषदेचा समारोप होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *