तीन दिवसीय ‘रामस्मरण व्याख्यानमाले’ला प्रारंभ
नागपूर समाचार : रामायणातील कोणताही प्रसंग, मूल्य प्रत्येकाने स्वीकारले तर ते स्वतःसाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी हिताचे ठरेल, असे मत संत साहित्याचे अभ्यासक प्रशांत सरनाईक यांनी व्यक्त केले.
केशवनगर सांस्कृतिक सभा आणि कलासंगम सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘रामस्मरण व्याख्यानमाले’ला सोमवारी प्रारंभ झाला. रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिराच्या परिसरातील महर्षी व्यास सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कोल्हापूर येथील संत साहित्याचे अभ्यासक प्रशांत सरनाईक यांचे ‘ रामायणातील अध्यात्म ‘ या विषयावर व्याख्यान झाले.
महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मंचावर केशवनगर सांस्कृतिक सभेचे अध्यक्ष सुनील काशीकर, सचिव प्रकाश देशपांडे, कलासंगम सांस्कृतिक मंडळचे उपाध्यक्ष प्रकाश खोब्रागडे व डाॅ.अविनाश वासेकर यांची उपस्थिती होती.
प्रशांत सरनाईक यांनी सुरुवातीला रामायण, राम, लक्ष्मण, भरत, दशरथ आदी नामांचा अर्थ समजवून सांगितला. रामाचे रूप, स्वरूप, अध्यात्मिक रूप, नाम जाणून घ्यायचे असेल तर रामायणापर्यंत जावे लागेल, असे ते म्हणाले. शुध्द मन आणि शुद्ध बुद्धी जेव्हा एकत्र येते तेव्हा रामतत्वाचा जन्म होते असे सांगताना त्यांनी आज समाजातील वातावरण प्रदूषित झाले असून ते सुधारायचे असेल तर रामायणातील अध्यात्म समजून घ्यावे लागेल, असे उदगार काढले.
श्रीपाद अपराजित म्हणाले, रामनामाचा महिमा अदभूत असून तो समजून घेतला तर आपण जगण्याचे अध्यात्म आपल्याला कळेल व आपण या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करू शकू.
प्रमुख संयोजक प्रकाश एदलाबादकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन प्रा. मिलिंद भाकरे यांनी मानले.
मूकबधीर विद्यार्थ्याची उपस्थिती
हिंदू संस्कृती, परंपरा, तत्वज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने मूकबधिर विद्यालय शंकनगर व निवासी मूकबधिर विद्यालय हुडकेशवर च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती होती लावली. दुभाषक कपिल वासे यांनी साइन लँग्वेज च्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत रामायण पोहोचवले.