नागपूर समाचार : केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉरमेशन (अमृत) योजनेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मॉडेल मिल येथील गोदरेज आनंदम येथे जलकुंभ तयार करण्यात आले आहे. याचे लोकार्पण शनिवार (ता.१) रोजी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी आणि राज्यांचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आमदार श्री. प्रवीण दटके, श्री.विकास कुंभारे, आमदार श्री. मोहन मते, महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय गुल्हाने, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी श्री. वाईकर, सहायक आयुक्त श्री गणेश राठोड यांच्यासह मनपाचा अधिकारी कर्मचारी व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
अमृत योजनेंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा प्रणालीचे उन्नतीकरण, बळकटीकरण व विस्तारीकरण केल्या जात आहे. पुढील काळात शहरात ३२ जलकुंभ तयार करण्यात येणार आहेत. यातील गोदरेज आनंदम जलकुंभ तयार करण्यात आले आहे. याद्वारे कर्नलबाग, नवि शुक्रवारी, दसरा रोड, राहातेकर वाडी, रामाजीची वाडी, राम मंदिर परिसर, टिळक पुतळा, गाडीखाना, महाल, तुळशीबाग, भुतीया दरवाजा, भोसलेवाडा, गोदरेज आनंदम परिसर, दक्षिणामूर्ती चौक, बडकस चौक, शिंगाडा मार्केट, कोठी रोड या परिसरात पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे पाणीपुरवठा प्रणालीचे उन्नतीकरण योजनेअंतर्गत हे लोकार्पण करण्यात आले. गोदरेज आनंदम येथे २० लक्ष लिटर २१ मीटर उंच टाक्यांचे बांधकाम करण्यात आले असुन १५ कि.मी. वितरण जलवाहीण्या टाकण्यात आल्या आहेत. या भागातील २०००० नागरिकांना याचा फायदा होणार आहे.