- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचा संकल्प : जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर

बालविवाह प्रतिबंधात्मक जनजागृती रॅली उत्साहात

नागपूर समाचार : बालविवाह रोखण्यासाठी संवेदनशीलतेने प्रयत्न करण्याची गरज आहे. बालविवाह प्रतिबंधात्मक उपाययोजनांबरोबरच प्रशासनातर्फे जनजागृतीही करण्यात येत आहे. जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रशासनाला समाजाचेही सहकार्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले.

बालविवाह प्रतिबंधात्मक जनजागृती रॅलीचे आज सकाळी व्हेरायटी चौक ते संविधान चौक मार्गादरम्यान आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून जिल्हाधिका-यांनी शुभारंभ केला. यावेळी ते बोलत होते. रॅलीत जिल्हा महिला व बालविकास विकास अधिकारी अपर्णा कोल्हे, जिल्हा परिविक्षा अधिकारी चंद्रकांत बोंडे, बाल कल्याण समिती अध्यक्षा छाया राऊत, सदस्य विनायक नंदेश्वर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नागपूर जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये आज बालविवाह प्रतिबंधात्मक जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. बालविवाहाचे प्रमाण आजही काही भागात आढळून येते. त्यामुळे बालविवाहास प्रतिबंधासाठी हागणदारीमुक्त गाव या संकल्पेवर आधारित बालविवाह मुक्त गाव ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी पुढील काही दिवस विविध जनजागृतीविषयक कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पुढे म्हणाले.

देशातील ग्रामीण आणि आदिवासीबहुल भागात काही समुदायांमध्ये बाल विवाहाची प्रथा आहे. भारतात अक्षय तृतीयेला अक्टी किंवा आखा तीज म्हणूनही ओळखले जाते. या काळात मोठ्या प्रमाणात बालविवाह होत असल्याचे आढळून आले आहे. यावर्षी अक्षय तृतीया 22 एप्रिलला साजरी केली जाणार आहे. या अनुषंगाने महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *