विदर्भाच्या 11 जिल्ह्यातील सुमारे 800 हून पत्रकार होतील सहभागी कृतिशील कार्यक्रमाच्या अनुषंगाने होणार चर्चा
नागपूर समाचार : पत्रकार आणि पत्रकारितेसाठी कृतिशील उपक्रम राबविणारी व्हॉईस ऑफ मीडिया’ही संघटना देशातील पत्रकारांसाठी हक्काची चळवळ बनली आहे. संघटनेचा विस्तार वेगाने होत आहे. अवघ्या दोन वर्षांत देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडियाचे जाळे 28 राज्यात व सर्व केंद्रशासित प्रदेशात पसरले आहे. संघटनेने 26 हजार सभासदांचा टप्पा पार केला आहे. या संघटनेचे विदर्भ विभाग अधिवेशन रविवार, 16 एप्रिल 2023 रोजी किंग्जवे ऑडिटोरिअम (परवाना भवन) कस्तुरचंद पार्कजवळ नागपूर येथे होत आहे. विदर्भस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन दुपारी 12 वाजता केंद्रीय भूपृष्ठवाहतूक व महामार्ग मंत्री मा. ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे राहतील.
यावेळी विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, मुख्य वक्ते म्हणून व्हॉइस ऑफ मीडियाचे केंद्रीय कार्याध्यक्ष संजय आवटे, प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार, व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्याध्यक्ष राजा माने, प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के यांची उपस्थिती राहील. अधिवेशनात विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष मनोगत आणि अहवाल सादरीकरण करतील. दुपारच्या दुसऱ्या सत्रात “बदलती पत्रकारिता आणि आव्हाने” यावर राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होत आहे. यात श्रीपाद अपराजित (संपादक, महाराष्ट्र टाइम्स), देवेंद्र गावंडे (संपादक, लोकसत्ता), शैलेश पांडे (संपादक, तरुण भारत डिजिटल) आदी मान्यवर सहभाग घेतील. तिसऱ्या सत्रात व्हॉईस ऑफ मीडियाच्या विविध विंगचे प्रदेश अध्यक्ष मनोगत आणि सादरीकरण करतील.
पत्रकारांच्या समस्यांवर चर्चा, उपायांवर मंथन होईल. व्हॉईस ऑफ मीडियाची भूमिका, भविष्यातील उपक्रम आदींची माहिती देण्यात येईल. या कार्यक्रमात आपण सहभागी होऊन पत्रकारांच्या हक्कासाठीच्या चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन व्हाईस ऑफ मीडियाचे विदर्भ अध्यक्ष मंगेश खाटिक, पालक सचिव (विदर्भ) संजय पडोळे, संयोजक तथा जिल्हा अध्यक्ष आनंद आंबेकर, शहर अध्यक्ष फहीम खान, जिल्हाध्यक्ष सर्वश्री लक्ष्मीकांत बगाडे (बुलढाणा), अमर घाटरे (अमरावती), नंदकिशोर परसावार (भंडारा), भागवत मापारी (वाशिम), संजय राठोड (यवतमाळ), प्रमोद पाणबुडे (वर्धा), व्यंकटेश दुडमवार (गडचिरोली), संजय खांडेकर (अकोला), प्रमोद नागनाथे (गोंदिया) आणि विदर्भ कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
ज्येष्ठ पत्रकार, मालक संपादकाचा सत्कार पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी ज्येष्ठ पत्रकार, संपादकाचा सत्कार करण्यात येणार आहे.
सत्कारमूर्तीत विजयबाबू दर्डा (माजी खासदार तथा एडिटर इन चीफ, लोकमत वृत्तपत्र समूह), श्रीधरराव सीताराम बलकी (चंद्रपूर), अनिल केशवराव पळसकर (बुलडाणा), वसंतराव ऋषीजी खेडेकर (बल्लारपूर), बाबूराव विठ्ठलराव परसावार (सिंदेवाही), रामभाऊजी नागपुरे, (सिर्सी, ता. उमरेड), शामराव मोतीराम बारई (ता. वडसा देसाईगंज), जि. गडचिरोली), विजय दत्तात्रय केंदरकर (अकोला), सुरज पाटील (यवतमाळ), विश्वंभर त्र्यंबक वाघमारे (बुलडाणा), रमेश मारोतराव दुरुगकर (ता. साकोली, जि. भंडारा), भाऊराव पंढरीनाथ रामटेके (ता. लाखांदूर, जि. भंडारा) यांचा समावेश आहे.
गर्जा महाराष्ट्र माझा…
100 हौशी कलावंत एकत्रित येऊन महाराष्ट्राभिमान जागविणाऱ्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या कार्यक्रमाची निर्मिती स्पार्क जनविकास फाऊंडेशनने केली आहे. विदर्भातील 100 कलावंतांचा महाराष्ट्र संस्कृती दर्शन घडविणारा कार्यक्रम दुपारी 4.30 वाजता सादर होणार आहे.