- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : नाईक तलाव व लेंडी तलाव पुनरूज्जीवन प्रकल्पाचे भूमिपूजन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती 

नागपूर समाचार : नागपूर शहराच्या मध्य भागातील नाईक तलाव आणि लेंडी तलावाच्या पुनरूज्जीवन कार्याचे शुक्रवारी (ता.१४) केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

नाईक तलाव परिसरात झालेल्या भूमिपूजन सोहळ्याला आमदार श्री. प्रवीण दटके, आमदार श्री. चंद्रशेखर बावनकुळे, आमदार श्री. विकास कुंभारे, आमदार श्री. कृष्णा खोपडे, मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी, मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, माजी आमदार श्री गिरीश व्यास, माजी महापौर श्री दयाशंकर तिवारी, माजी महापौर अर्चना डेहनकर, माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर, माजी आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन, माजी नगरसेविका वंदना यंगटवार, माजी नगरसेवक राजेश घोडपागे आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी म्हणाले, तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे नाईक तलाव आणि लेंडी तलावामध्ये असलेली घाण स्वच्छ करून तलावाचे खोलीकरण केले जाणार आहे. त्यामुळे तलावात स्वच्छ पाणी राहील, तलावाचे सौंदर्यीकरण होईल, नागरिकांना फिरायला जागा निर्माण होईल. मात्र हे सर्व करताना तलावात घाण जाणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी येथील रहिवासी जनतेची आहे. तलावात अतिक्रमण आणि घाण होणार नाही, याची नागरिकांनी जबाबदारी घेण्याचे आवाहन यावेळी ना. गडकरी यांनी केले. तलावाचे सौंदर्यीकरण ठेवण्याची नागरिकांनी जबाबदारी स्वीकारल्यास या ठिकाणी फ्लोटिंग बोट ची व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील गतवैभव प्राप्त असलेल्या नाईक आणि लेंडी तलावांचे पुनरुज्जीवन हा ऐतिहासिक क्षण असल्याचे नमूद केले. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी यांनी अमृतकाळात आणलेल्या अमृत योजने अंतर्गत तलावांचे पुनरुज्जीवन होणार आहे. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून दोन्ही तलावांचे पुनरुज्जीवन होणार असून या कार्यासाठी मध्य नागपूरचे आमदार श्री विकास कुंभारे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे सांगत त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

आमदार प्रवीण दटके यांनी प्रकल्पाच्या कार्यप्रति आनंद व्यक्त करीत स्थानिक नागरिकांसाठी मोठी सुविधा निर्माण होणार असल्याचे सांगितले. त्यांनी या भागात उड्डाण पूल आणि विद्युत खांबांच्या विषयाकडे लक्ष वेधले. 

आमदार विकास कुंभारे यांनी दोन्ही तलावांच्या पुनरुज्जीवन कार्याला केंद्र आणि राज्य सरकारकडून परवानगी मिळाल्याबद्दल मध्य नागपूरच्या जनतेच्या वतीने ना. श्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. 

मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांनी प्रास्ताविकामध्ये नाईक तलाव व लेंडी तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाची विस्तृत माहिती दिली. संचालन श्वेता शेलगावकर यांनी मानले.

नाईक तलाव पुनरूज्जीवन प्रकल्प

नाईक तलाव नागपूर शहरातील मध्य भागात असून तलावाचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे ३.० हेक्टर आहे. केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेअंतर्गत शासनाने नाईक तलाव पुनरुज्जीवन या १२.९५ कोटीच्या प्रकल्पास महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभाग मंत्रालयाद्वारे प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. यामध्ये केंद्र शासनाचा हिस्सा रु. ३.२४ कोटी (२५ टक्के), राज्य शासनाचा हिस्सा रु. ३.२४ कोटी (२५ टक्के) व मनपाचा हिस्सा रु. ६.४८ कोटी (५० टक्के) आहे.

नाईक तलाव पुनरुज्जिवन प्रकल्पात मुख्यत्वे खालील कामांचा समावेश आहे.

१) तलावातील गाळ काढणे,

२) पादचारी मार्ग (520 मीटर लांब / 2.5 मीटर रूंद)

३) पावसाळी नाली टाकणे (550 मी. लांब)

४) तलाव किनार भिंत (Edge Wall) (735Rmt / 4M width)

५) मलवाहिनी टाकणे (450Rmt)

६) योगा शेड व विसर्जन टँक

नाईक तलाव पुनरुज्जिवन प्रकल्पामध्ये तलावातील गाळ काढल्याने अंदाजे ६४,००० Cum अतिरिक्त जलसंचय तलावात होणार आहे.

लेंडी तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पात मुख्यत्वे खालील कामांचा समावेश आहे.

१) तलावातील गाळ काढणे

३) पावसाळी नाली टाकणे (600 मी. लांब)

५) तलाव किनार भिंत (Edge Wall)

२) पादचारी मार्ग (610 मी. लांब / 3 मी. रुंद)

४) मलवाहिनी टाकणे (800 मी.)

६) विसर्जन टँक

लेंडी तलाव पुनरुज्जिवन प्रकल्पामध्ये तलावातील गाळ काढल्याने अंदाजे ४५,००० Cum अतिरिक्त जलसंचय तलावात होणार आहे.

लेंडी तलावात अतिक्रमण असून सदरहु तलाव नझुल अंतर्गत येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *