‘बेरा : एक अघोरी’ २८ एप्रिलपासून होणार प्रदर्शित
नागपूर समाचार : वैदर्भीय निर्मात्यांनी साकारलेला ‘बेरा : एक अघोरी’ हा हॉरर चित्रपट प्रदर्शनाआधीच चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत असून, यातील गाण्यांच्या रील्सची सोशल मीडियावर देशभरात धूम आहे.
धिराल एंटरटेनमेंट द्वारा प्रस्तुत, राजू भारती निर्मित हा चित्रपट शुक्रवार २८ एप्रिल रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. शक्तिवीर धिराल लिखित आणि प्रेम धिराल यांच्यातर्फे दिग्दर्शित हा चित्रपट मनोरंजनाने परिपूर्ण आहे. हा चित्रपट मूळचा हॉरर असला तरी रोचक प्रसंग आणि संवादांचाही यात समावेश आहे. रोमान्सचा तडकाही यात आहे. शक्तिवीर धिराल, प्रेम धिराल आणि प्राजक्ता शिंदे यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. प्राजक्तानं यात सुंदरीची भूमिका साकारली आहे, पाहणं अधिक रोचक, रोमांचक ठरेल.
‘बेरा : एक अघोरी’ नवा विचार करणाऱ्या जमान्याचा, नवा तडका असलेला चित्रपट आहे. तरुणाई हा चित्रपट अधिक एन्जॉय करतील, असा विश्वास निर्माते राजू भारती यांनी व्यक्त केला. चित्रपटात प्रेम-शक्ती या संगीतकार जोडीने कर्णप्रिय संगीत दिले आहे. त्याची गाणी आतापासूनच लोकप्रिय होत असून, सोशल मीडियावर त्याचे रील्स तयार होत आहेत. बॉलिवूडचे गायक नक्काश अजीज, शाहिद माल्या, वैशाली यांनी ही गीते गायली आहेत. रोशन खडगी हे चित्रपटाचे डीओपी आहेत. ऑडियो लॅब मीडिया कॉर्पोरेशन द्वारा प्रदर्शित हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
निर्माते राजू भारती व चित्रपटातील बहुतांश कलावंत विदर्भातीलच आहेत. वैदर्भीय मातीत एवढी दर्जेदार कलाकृती निर्माण होणे, ही अभिमानाची बाब मानली जात आहे.