नागपूर समाचार : ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिन’ निमित्त कलाश्री फाउंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कथक कार्यशाळेला विदर्भासह महाराष्ट्र आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. बी. आर. मुंडले ब्लाइंड रिलीफ असोसिएशनच्या सभागृहात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथक गुरू पंडित राजेंद्र गंगाणी यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी 150 विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले आहेत.
कलाश्री फाउंडेशनच्या संचालिका ज्येष्ठ कथक गुरू व नृत्यांगना डॉ. भाग्यलक्ष्मी देशकर यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन आज शुकवारी पं. राजेंद्र गंगाणी यांच्या हस्ते दीपप्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ गुरू मदन पांडे व गुरू ललिता हरदास यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. अपर्णा अग्निहोत्री, डॉ. भाग्यलक्ष्मी देशकर, प्राजक्ता चौधरी व नीलाक्षी खंडकर- सक्सेना यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
नागपूरसह, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, ब्रम्हपुरी, नाशिक, पुणे, मुंबई, दिल्ली आदी ठिकाणाहून कार्यशाळेत 150 विद्यार्थ्यांनी सहभागी झाले आहेत. कार्यशाळेचे प्रारंभिक ते प्रवेशिका पूर्ण, मध्यमा ते मध्यमा पूर्ण व अलंकार ते बीए, एमए, शिक्षक व गुरू असे तीन गट करण्यात आले असल्याची माहिती भाग्यलक्ष्मी देशकर यांनी प्रास्ताविकातून दिली. त्यानंतर पं. राजेंद्र गंगाणी यांच्या मार्गदर्शनात नीलाक्षी खंडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तबल्यावर किशोर गंगाणी, शास्त्रीय गायन विनोद गंगाणी व सारंगीवर नफीज अहमद यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संमती अडावदकर हिने केले.
पं. राजेंद्र गंगाणी यांची आज कथक नृत्य प्रस्तुती
आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त आज, शनिवार, 29 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता कथक गुरू पं. राजेंद्र गंगाणी यांची कथक नृत्य प्रस्तुती होणार आहे. याशिवाय, पं. गंगाणी यांच्या शिष्या नीलाक्षी खंडकर-सक्सेना या देखील एकल नृत्य प्रस्तुत करतील. कलाश्रीच्या संचालिका भाग्यलक्ष्मी देशकर यांच्याह नागपुरातील सर्व कथक गुरूदेखील या कार्यक्रमात कथक नृत्य सादर करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.