‘चित्रार्थ – 2023’ चा समारोप , उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रदर्शन आज देखील सर्वांसाठी खुले
नागपूर समाचार : नवीन शिक्षण धोरणात थियरी आणि स्किल अर्थात कौशल्य याला समान महत्व देण्यात आले आहे. त₹येणारा काळ हा ‘क्रिएटिव्ह माइंड्स’ चा राहणार असून प्रत्येकाने अभ्यासासोबत कौशल्य विकासावर देखील भर द्यावा, असा हितोपदेश नागपूर विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी दिला.
धरमपेठ एज्युकेशन सोसायटीच्या नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरच्यावतीने नटराज आर्ट गॅलरीमध्ये ‘चित्रार्थ – 2023’ चा समारोप आज झाला. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी मंचावर धरमपेठ एज्युकेशन सोसायटीचे सचिव मंगेश फाटक, नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरचे प्राचार्य डॉ. रविंद्र हरिदास, प्रोफेसर डॉ. सदानंद चौधरी व कुमार शास्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपण अभ्यासपूर्ण कलेचे मंचन केल्यास त्यातून आपण अर्थार्जन करू शकतो. त्यासाठी कलेची साधना करणे आवश्यक आहे, असे डॉ. दुधे म्हणाले. कलेला कमी लेखू नये आणि सातत्याने त्याची साधना केल्यास यशप्राप्ती निश्चित आहे, असे देखील ते म्हणाले. तत्पूर्वी त्यांनी प्रदर्शनी प्रत्येक कलाकृती बघितली आणि विद्यार्थी कलाकारांशी संवाद साधला.
नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरचे प्राचार्य डॉ. रविंद्र हरिदास यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. प्रदर्शनाला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने प्रदर्शनी आणखी एक दिवस खुली राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात मंगेश फाटक यांनी अश्या आयोजनांचे महत्व विषद केले. सूत्रसंचालन प्रीती दुबे यांनी केले.