नागपूर समाचार : कलाश्री आर्ट फाउंडेशनच्यावतीने आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या प्रसिद्ध कथक गुरू पं. राजेंद्र गंगाणी यांच्या तीन दिवसीय कथक नृत्य कार्यशाळेचा थाटात समारोप झाला. समारोपीय कार्यक्रमाला स्थानिक कथक गुरू, विद्यार्थी यांची मोठी उपस्थिती लाभली.
गुरू पं. राजेंद्र गंगाणी यांनी कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी प्रारंभिक ते प्रवेशिका पूर्णच्या विद्र्थ्यांना गणेश स्तुती, तोडे-मुकडे, तिहाई संदर्भात मार्गदर्शन केले तर मध्यमा ते विशारद, बीए व एमए आणि स्थानिक गुरूंच्या वर्गाला चौतालमध्ये गणेश स्तुती, गणेश परण, ठाठ, उठाण, आमद, लडी यांचे प्रशिक्षण दिले. दुस-या दिवशी लयकारीयुक्त तिहाई, तोडे-तुकडे आणि नृत्य सादरीकरणावर भर देण्यात आला. तिस-या व अंतिम दिवशी जोड-बोल, चौतालमध्ये चाला आणि पहिल्या दिवशी शिकवण्यात आलेल्या रचनांचा अभ्यास करून घेण्यात आला.
त्यानंतर झालेल्या समारोपीय सत्रात पं. राजेंद्र गंगाणी यांनी नागपूर-विदर्भातील नृत्यसाधकांसाठी तीन महिन्यातून एकदा सादरीकरण आधारित एक दिवसीय कथक कार्यशाळा आयोजित करण्याची घोषणा केली. या कार्यशाळेचा लाभ साधकांना मंचावर कथक सादर करण्याकरीता होईल, असे ते मळणाले.
त्यानंतर पं. गंगाणी यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना यावेळी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. आयोजक कलाश्री आर्ट फाउंडेशनच्या संचालिका डॉ. भाग्यलक्ष्मी देशकर यांनी सर्वांचे आभार मानले.