- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : गोरले लेआउट येथे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे लोकार्पण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील ३१७ दवाखान्यांचे लोकार्पण : नागपुरात उपमुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती

नागपूर समाचार : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आणि कामगार दिन या दोन्ही दिवसांच्या विशेष औचित्याने राज्यभरातील विविध भागात ३१७ ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आभासी माध्यमातून सोमवारी (ता.१) लोकार्पण झाले. नागपुरात नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत लक्ष्मीनगर झोनमधील गोरले लेआउट येथे निर्मित ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केले. याप्रसंगी गोरले लेआउट येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती.

मंचावर आमदार श्री. प्रवीण दटके, मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त तथा नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजय गुल्हाने, आरोग्य उपसंचालक नागपूर डॉ. विनीता जैन, अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी रिमोटची कळ दाबून राज्यातील विविध जिल्हा आणि तालुक्यातील ३१७ दवाखान्यांचे लोकार्पण केले. गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांना उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा देण्याच्या उद्देशाने नव्या आरोग्य योजनेची सुरूवात होत असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्र श्री. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात राज्यात ५०० ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ तयार करण्याचे उद्दिष्ट मांडले व त्याला तात्काळ निधीची मंजूरी केली व आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी या संपूर्ण योजनेला गती देउन अवघ्या दोन महिन्यात ३१७ दवाखाने पूर्णत्वास झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांचे अभिनंदन केले. राज्यात ५०० ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून आता ते ७०० करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी यावेळी जाहिर केले.

उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी मांडलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ संकल्पनेचे कौतुक करीत ही संकल्पना गतीशीलरित्या पूर्णत्वास नेण्याबद्दल आरोग्य मंत्री श्री. तानाजी सावंत यांचे अभिनंदन केले. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’मध्ये विविध प्रकारच्या ३० सेवा, औषध, तपासण्या मोफत असून या दवाखान्याची वेळ दुपारी २ ते रात्री १० वाजता अशी असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या दवाखान्यांमुळे राज्यातील गोरगरीब व मध्यमवर्गीयांना मोठा फायदा होणार असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले. महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत उपचारासाठीची रक्कम वाढविण्यात आली असून आता ५ लाखापर्यंतचा उपचार, ९०० प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. याशिवाय पंतप्रधान आयुष्मान भारत जनआरोग्य योजने अंतर्गत सुद्धा ५ लाखांपर्यंतचा उपचार मोफत मिळणार आहे. एकूणच जनतेला आरोग्याच्या उत्तम सुविधा पुरविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्राधान्याने कार्य करीत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ची संपूर्ण संकल्पना विषद केली. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे सुरू केलेला ‘आपला दवाखाना’ राज्यभर सुरू करण्याची संकल्पना मांडली. सुरूवातीला महानगरपालिका हद्दीतच हे दवाखाने सुरू करण्याचा मानस होता मात्र राज्यातील खेड्यापाड्यातील गोरगरीब जनतेलाही या योजनेचा लाभ व्हावा यासाठी योजनेचा विस्तार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नागरी आरोग्‍य वर्धिनी केंद्रे १५ वा वित्त आयोग अंतर्गत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ स्थापित करण्यात येत आहेत. शहरी भागातील एकूण लोकसंख्येपैकी साधारणतः १२,००० ते २०,००० लोकसंख्येसाठी एक याप्रमाणे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामध्ये बाह्यरुग्ण सेवा (वेळ दुपारी २.०० ते रात्री १०.००), मोफत औषधोपचार, मोफत तपासणी, टेलीकन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण या सेवांसोबतच महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे (M/S. HLL) रक्त तपासणी, मानसिक आरोग्यासाठी समूपदेशन, आवश्यकतेनुसार विशेषज्ञ संदर्भ सेवा उपलब्ध आहेत.

याशिवाय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्रांतून रूग्णांना गरजेनुसार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून बाह्यरुग्ण विभागातील खालील विशेषज्ञ संदर्भ सेवा विशेषज्ञांमार्फत प्रदान करण्यात येतील. यामध्ये फिजीशियन, स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, कान नाक घसा तज्ञ या सुविधा सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येतील. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्रांमध्ये वैद्यकिय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशिय कर्मचारी, अटेंडंट / गार्ड आणि सफाई कर्मचारी आदी सेवा देणार असल्याचेही आरोग्य मंत्र्यांनी प्रास्ताविकात सांगितले.

गोरले लेआउट येथील कार्यक्रमाला माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी महापौर श्री. संदीप जोशी, माजी महापौर नंदा जिचकार, माजी नगरसेवक सर्वश्री अविनाश ठाकरे, किशोर वानखेडे, प्रकाश भोयर, लहुकुमार बेहते, माजी नगरसेविका पल्लवी श्यामकुळे, ॲड. मिनाक्षी तेलगोटे, सोनाली कडू आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *