नागपुर समाचार : सी. पी अँड बेरार कॉलेजच्यावतीने ‘वस्तु आणि सेवा कर – जीएसटी’ विषयावर घेण्यात आलेल्या परिसंवादाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काटोलच्या नबिरा कॉलेजचे डॉ. पुनीत राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या शंकाचे निरसन केले.
कॉलेजच्या न्यू सेमिनार हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात डॉ. पुनीत राऊत यांनी जीएसटीसंदर्भातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. जीएसटीचे रजिस्ट्रेशन कोणी आणि केव्हा करावे, जीएसटीचा कायदा काय आहे, त्यामागे सरकारची भूमिका काय आहे, विविध राज्यांमध्ये जीएसटीसाठी कोणाला रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक, तसेच जीएसटीचे दर एकूण काय आहेत, आय जीएसटी सीजीएसटी, एसजी एसटी, युजीएसटी म्हणजे काय आहे या सगळ्यांच्या बाबतीत अत्यंत सविस्तरपणे आणि अत्यंत सुलभ भाषेत डॉ. राऊत यांनी मार्गदर्शन केले. जीएसटीचे रजिस्ट्रेशन करण्याकरीताची प्रक्रिया, तसेच रजिस्ट्रेशन केल्यानंतर याचे इनपुट टॅक्स कॅल्क्युलेशन आणि आऊटपुट टॅक्स कॅल्क्युलेशन कसे केले जाते, क्रेडिट कॅल्क्युलेशन कसे केले जाते, याची अत्यंत सरळपणे त्यांनी माहिती दिली. पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन कसे करावे याचेही प्रॅक्टिकल नॉलेज त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.
प्रास्ताविक करताना आयोजन सचिव डॉ. मेधा कानेटकर यांनी जीएसटीसंदर्भात विद्यार्थ्यांनी आपले नॉलेज अपडेट ठेवावे, असे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बारहाते यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायल बोभाटे हिने तर आभार प्रदर्शन काजल बुरडे हिने केले.