हिंदू धर्माविषयी अप्रिती निर्माण करण्याचा काही शाळांचा प्रयत्न – विवेक घळसासी
‘धर्मों के विषय में अधर्मी दुष्प्रचार’ पुस्तकाचे थाटात प्रकाशन
नागपूर, 5 मे 223
हिंदू धर्मातील चालीरिती, परंपरांना काही शाळा प्रतिबंध करीत असून इतर धर्मांचे संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करीत आहे. हिंदू धर्माविषयी अप्रिती निर्माण करणा-या या शाळांमध्ये आपल्या मुलांना टाकायचे की नाही याचा विचार पालकांनी करायची वेळ आली आहे, असे मत विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ नागरिक महामंडळ (विदर्भ) नागपूरतर्फे श्रद्धेय शंकरराव सुपारे लिखित ‘धर्मों के विषय में अधर्मी दुष्प्रचार’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख अतिथी विवेक घळसासी यांच्या हस्ते झाले. शुक्रवारी माता अनुसूया सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ अध्यक्ष प्रा. प्रभूजी देशपांडे होते. मंचावर लेखक शंकरराव सुपारे, ज्येष्ठ नागरिक महामंडळ (विदर्भ) नागपूरचे कार्याध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत तुळणकर व सचिव अॅड. अविनाश तेलंग यांची उपस्थिती होती.
विवेक घळसासी यांनी सुरुवातीला बौद्ध पौर्णिमेनिमित्ताने भगवान बुद्धांना अभिवादन केले. शंकरराव सुपारे यांनी लिहिलेले हे पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज असून त्यातून त्यांना सर्वधर्मसमभावाची शिकवण मिळेल, असे विवेक घळसासी म्हणाले. वर्तमानकाळात भारतीय संस्कृती, परंपरा, अध्यात्म नष्ट करण्यासाठी सुनियोजित प्रयत्न केले जात असून सोशल माध्यमांद्वारे जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. समलैंगिक विवाह, केरळ स्टोरी सारखे अनेक दाखले देत विवेक घळसासी यांनी देशातील परिस्थितीचा आढावा घेतला व युवा पिढीच्या मनामध्ये विशुद्ध समरसतेचा विचार निर्माण करण्याचे काम हा ग्रंथ करेल, असे विचार मांडले.
प्रभूजी देशपांडे यांनी अध्यक्षीय भाषणातून ज्येष्ठांनी आनंदी जीवन जगायचे असेल तर त्यांनी सकारात्मक विचारांची कास धरावी असे उद्गार काढले. आपल्या धर्मातील ‘वसुधैव कुटुंबकम्’ सारख्या अनेक उत्तम विचारांचा प्रचार करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रा. मीनल सांगोळे यांनी शंकरराव सुपारे यांचे मनोगत वाचून दाखवले. ज्येष्ठांच्या समस्या सहायक आयुक्तांपर्यंत पोहोचवल्या असून पालकमंत्रांच्या सहकार्याने त्या सोडविण्यात येतील, अशी माहिती अॅड. अविनाश तेलंग यांनी प्रास्ताविकातून दिली. याप्रसंगी डॉ विजया जोशी, लक्ष्मी राऊत, विजय भोयर, शंकर चौधरी, रवी सुपारे यांच्यासह अनेक ज्येष्ठांचा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी तसेच, काहींचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी चिंचाळकर यांनी केले तर सुनीता जैन यांनी पसायदान सादर केले. डॉ. दीपक शेंडेकर यांनी आभार मानले.