नागपूर व चंद्रपूरमध्ये एकाच दिवशी होणार महोत्सवाला प्रारंभ, भारतभरातील 300 संस्था होणार सहभागी
नागपूर समाचार : जलसंवर्धनासाठी महत्वाचे पाऊल म्हणून बहुगुणी वटवृक्षाचे रोपण करा असा संदेश देण्यासाठी ऩटराज निकेतन संस्था, नागपूर च्या पुढाकाराने आणि मैत्री परिवार संस्थेच्या सहकार्याने “वटवृक्ष वृक्षारोपण’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उदघाटन शनिवार, 3 जून रोजी अर्थात ‘वटसावित्री’च्या दिवशी नागपूर आणि चंद्रपूर येथे करण्यात येणार आहे.
चंद्रपूर येथे सकाळी ९ वाजता अटलबिहारी वाजपेयी संकुल येथे तर संध्याकाळी ५ वाजता पंजाबराव कृषी विद्यापीठ दाभा अमरावती रोड नागपूर येथे या महोत्सवाचे उदघाटन केले जाईल, अशी माहिती नटराज निकेतन संस्थेच्या अध्यक्षा मंगला विटेकर यांनी आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
भारतभरातील तब्बल ३०० पेक्षा जास्त समाजसेवी संघटना कार्याच्या यशश्वीतेसाठी कार्य करीत असून ९ जुलै पर्यंत संपूर्ण भारतात हा महोत्सव राबवला जाणार आहे. या वटवृक्षारोपण महोत्सवाची नोंद ‘गिनिज बुक ऑफ़ वर्ल्ड रिकॉर्ड’ मध्ये केली जाणार आहे.
या महोत्सवासाठी संस्थेचे संस्थापक विलास पात्रीकर आणि अध्यक्षा मंगला पात्रीकर यांचे मार्गदर्शन लाभले असून संकल्पना डॉ. भावना सलामे (कुलसंगे) आणि तसेच सामविद इंटरनॅशनल आणि वॉटरशॉपी वर्ल्डवाईड चे संचालक जलतज्ञ मुकुंद पात्रीकर यांची आहे. वटवृक्ष कार्यक्रम समिती प्रमुख अॅड. मधुरा व्यास आणि हर्षदा पात्रीकर आहेत.
मिळणार ई-प्रमाणपत्र
वृक्षारोपण करणाऱ्याला प्रत्येक व्यक्तीला ई-प्रमाणपत्र देण्यात येणार असून एक वर्ष वृक्षाची देखरेख करण्याऱ्याला ‘गोल्डन’ ई-प्रमाणपत्र तर दोन वर्ष झाड जगवणाऱ्याला ‘ग्रीन रिवोल्युशन पिन’ देऊन त्याचा जागतिक पातळीवर सन्मान करण्यात येईल. ज्या संस्था या उपक्रमास यशस्वी करतील त्या संस्थांना सिल्व्हर, गोल्डन आणि ग्रीन रीवोल्युशन पिन देऊन सन्मानित करण्यात येईल. सामविद इंटरनँशनल, वाँटरशाँपी वर्ल्डवाईड, हल्दीराम चैरिटेबल ट्रस्ट, अमरस्वरूप फाउंडेशन यांचे सहकार्य या महोत्सवाला लाभले आहे. अधिक माहिती साठी ९०४९११६६३३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
उद्घाटनाला अभिनेत्री स्नेहल राय यांची उपस्थिती
३ जून रोजी सकाळी ९ चंद्रपूर येथे होणा-या वटवृक्ष वृक्षारोपण महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला नटराज निकेतन संस्था “बनियान ट्री प्लांटेशन फेस्टिवल ग्लोबलची ब्रांड एंबेसडर अभिनेत्री स्नेहल राय यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विशेष अतिथी म्हणून चंद्रपुर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गोडा, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, सहायक जिल्हाधिकारी विवेक जॉनसन व विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांची उपस्थिती राहील. नागपुरात संध्याकाळी ५ वाजता होणा-या वटवृक्षारोपण महोत्सवाचे उदघाटन मनपा आयुक्त बी. राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार असून प्रधान मुख्य वन संरक्षक नरेश झुरमुरे, रमेश कुमार, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे भारत सिंग हाडा, विभागीय वन अधिकारी गीता नन्नावरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पत्रकार परिषदेला नटराज निकेतन संस्थेच्या अध्यक्षा मंगला पात्रीकर, सचिव मुकुंद पात्रीकर, मैत्री परिवारचे प्रमोद पेंडके, प्रकाश रथकंठीवार, डॉ. भावना सलामे – कुलसुंगे आदींची उपस्थिती होती.