केद्र सरकारचे विविध विभागांमध्ये तसेच संस्थांमध्ये नव्याने भर्ती झालेल्या 70 हजार तरुणांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण
नागपूर समाचार : केंद्र सरकारचे विविध विभाग तसेच संस्थांमध्ये नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 70,000 तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचे वितरण केले. यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला पंतप्रधानांनी संबोधित देखील केले. देशभरातून निवडण्यात आलेले हे उमेदवार आता केंद्र सरकारच्या आर्थिक सेवा, टपाल,शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, लेखापरीक्षण तसेच लेखा विभाग, अशा विविध विभागांमध्ये तसेच संरक्षण, महसूल,आरोग्य आणि कुटुंब कल्याण,अणुउर्जा,रेल्वे, गृह व्यवहार इत्यादी अनेक केंद्रीय मंत्रालयांमध्ये सेवेत कार्यरत होतील.
देशभरात विविध राज्यांमध्ये देखील अशाच प्रकारचे रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून तेथे उपस्थित केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप केले जात आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे तसेच नागपूर या शहरांमध्ये हे मेळावे आयोजित करण्यात आले.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर ॲकॅडमी ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या सभागृहात आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नवनियुक्त उमेदवारांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. केंद्रीय आर्थिक सेवा विभागाच्या मार्गदर्शनाखाली बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे या सहाव्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय राज्यमंत्री आठवले म्हणाले की, भारत सरकारच्या विविध विभाग आणि संस्थांमध्ये देशभरातील तरुणांना दरवर्षी 10 लाख नोकऱ्या देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. ते म्हणाले की या उपक्रमासह भारत सरकारने रोजगार निर्मितीसाठी इतर अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.
स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी मुद्रा योजनेंतर्गत आतापर्यंत 39 कोटी कर्जे देण्यात आली आहेत तसेच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय व्हेंचर कॅपिटल फंड योजना चालवते आणि एमएसएमई विभाग गरजूंना अनुदान देखील देते अशी माहिती त्यांनी दिली. मुंबईत आज झालेल्या या मेळाव्यामध्ये 452 उमेदवारांना प्रत्यक्षपणे तर 284 उमेदवारांना आभासी पद्धतीने नियुक्तीपत्रे सुपूर्द करण्यात आली. हे नवनियुक्त उमेदवार भारतीय नौदल, सीडीएस, सिडबी,सीपीडब्ल्यूडी, जीआयसी, माझगाव गोदी,केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालय, संरक्षण मंत्रालय,उच्च शिक्षण मंत्रालय -आयआयटी मुंबई, संरक्षण मंत्रालय-डीआरडीओ, सीजीएसटी, भारतीय रेल्वे, भारतीय टपाल विभाग, सीबीडीटी यांसह सार्वजनिक क्षेत्रातील विविध बँकांच्या सेवेत सामावून घेतले जाणार आहेत.
पुण्यातील विमाननगर परिसरातील सिंबायोसिस संस्थेमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत 282 जणांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. नवनियुक्त उमेदवारांनी देश उभारणीसाठी आपले योगदान देण्याच्या भावनेतून काम करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी यावेळी केले. ते पुढे म्हणाले की , आज ज्यांना नोकरीचे नियुक्ती पत्र मिळाले आहे त्यांच्या जीवनातील अंधकार दूर होण्यास या नियुक्ती पत्रांचा उपयोग होणार आहे. या तरुणांना सरकारी नोकरीत सामावून घेण्यामागे देश निर्माण कार्यात देशातील तरुणांमध्ये असलेल्या क्षमतेचा वापर व्हावा अशी अपेक्षा असल्याचे पाटील यांनी सांगितले.
नागपूरच्या धरमपेठ येथील वनामती संस्थेच्या सभागृहात रोजगार मेळ्याअंर्गत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शासकीय नोकरीप्राप्त सुमारे 400 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना, प्रत्येकाने जीवनामध्ये कुठलेही कौशल्य आत्मसात करून त्याचा जीवनात उपयोग करून स्वावंलबी व्हावे, स्वयंरोजगाराची कास धरावी त्याचप्रमाणे रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार देणारे व्हावे असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. यावेळी त्यांनी बांबूपासून कोळसा निर्मिती, टाकाऊ कपडे चिंध्या यांचा वापर करून उत्तम गालिचे निर्मिती अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. शासकीय सेवेत दाखल झालेल्या नवनियुक्त कर्मचाऱ्यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अभिनंदन केले.