- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : राष्ट्रपतींच्या दौऱ्यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडून प्रशासनाच्या पूर्वतयारीचा आढावा

नागपूर समाचार : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या 4 ते 6 जुलै 2023 दरम्यान नागपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांच्या नियोजित दौऱ्याबाबत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला. दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या.

राष्ट्रपतींच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सहपोलीस आयुक्त अस्वती दोरजे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विद्याभवनाचे राजेंद्र पुरोहित तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे गडचिरोली व वर्ध्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक, गोंडवाना विद्यापीठ व महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ व इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी अधिकारी उपस्थित होते. 

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ, नागपूरजवळील कोराडी येथे रामायण सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण आणि वर्धा येथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ 5 व 6 जुलै रोजी होणार आहे. या कार्यक्रमस्थळी पुरेशी सुरक्षा व्यवस्था तसेच राष्ट्रपती भवनाद्वारे निर्देशीत सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. राजशिष्टाचार व आदरातिथ्याचे योग्य पालन व्हावे. कार्यक्रमास्थळी व्यासपीठ, बैठक व्यवस्था, अग्नीरोधक यंत्रणा व विद्युत व्यवस्थेचे संबंधीत विभागाकडून सुरक्षीततेचे प्रमाणीकरण करणे तसेच दौऱ्याच्या सर्व ठिकाणी आरोग्य पथक सर्व सुविधांसह सज्ज ठेवण्याच्या सूचना श्रीमती बिदरी यांनी दिल्या. दरम्यान, श्रीमती बिदरी या गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांचा दौरा करणार असून याठिकाणी प्रशासनाच्या सज्जतेचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *