एक रुपया भरुन करा, प्रधानमंत्री पीक विमा योजनेची नोंदणी
नागपूर समाचार : कृषी विभागाच्या वतीने प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती जिल्ह्यात सर्व दूर व्हावी यासाठी चित्ररथ तयार केला असून आजपासून हा चित्ररथ जिल्ह्यात ग्रामीण भागात जावून पीक विमा योजनेची माहिती देणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या चित्ररथाचा प्रारंभ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी हिरवी झेंडी दाखवून केला.
यावेळी कृषी आयुक्तालयाचे पालक संचालक (प्रक्रिया व नियोजन) सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे, आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना कडु, आयसीआयसीआय लोम्बाइर्ड जनरल इन्शुरन्स कंपनीचे विभागीय व्यवस्थापक नमन वर्मा, तंत्र अधिकारी सुवर्णा माळी तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सन 2023-24 पासून सर्वसमावेशक पिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रती अर्ज केवळ एक रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, कीड रोगासारख्या टाळता न येऊ शकणाऱ्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देऊन भरपाई देणारी योजना आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अंतिम तारीख खरीप हंगाम 2023 करिता 31 जुलै असून या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. ही योजना खरीप हंगाम 2020 पासून तीन वर्षांसाठी राबविण्यास मान्यता देण्यात आली होती. तथापी, केंद्र शासनाच्या सुचनेनुसार कप अँड कॅप मॅाडेलनुसार ही योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 या हंगामासाठी तीन वर्षाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून 3 वर्षांसाठी निवड करण्यात आलेली आहे.