नागपूर समाचार : दिनांक 1 ऑगष्ट 2023 रोजी कमला नेहरू महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व कमला नेहरू जयंती साजरी करण्यात आली. अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. श्रीमती सुहासिनी वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक व कमलाजींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा व संस्थेच्या अध्यक्षा डॉ. श्रीमती सुहासिनी वंजारी यांनी अध्यक्षीय भाषणातून ‘स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे व तो मी मिळविणारच’ असा नारा देणारे लोकमान्य टिळक हे थोर राष्ट्रभक्त होते. टिळकांनी मंडालेच्या तुरूंगात असताना ‘गीतारहस्य’ ग्रंथाची रचना करून समाजप्रबोधनाचे काम केले. भारतीय जनतेमध्ये प्रखर राष्ट्रभक्ती निर्माण करून स्वातंत्र्य मिळण्याकरिता अनेक उग्र आंदोलने केले.
टिळकांनी गणेशोत्सवाद्वारे लोकांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण केली. टिळकांच्या राष्ट्रवादाची व राष्ट्रप्रेमाची आज देशाला आवश्यकता आहे. तसेच स्व. कमला नेहरूच्या जयंतीनिमित्त कमलाजींच्या त्यांच्या त्यागाचा व सोज्वळ व्यक्तीमत्वाचा परिचय करून दिला. कमलाजींनी इंदिरा गांधीसारखे कन्यारत्न व कणखर नेतृत्व भारताला दिले असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला अमर सेवा मंडळाचे सचिव तथा नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अड.अभिजित वंजारी तसेच संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ. स्मिता वंजारी यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप बडवाईक यांनी प्रास्ताविक केले. तर संचालन व आभार डॉ. वासुदेव गुरनुले यांनी मानले. याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.