नागपूर समाचार : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मेरी माटी मेरा देश या उपक्रमाची भव्य सुरुवात आज जिल्हा परिषदेमधून करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता विष्णूजी कोकड्डे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी संपूर्ण जिल्ह्यात हे अभियान उत्साहात राबविण्याचे आवाहन यावेळी केले.
मेरा मिट्टी मेरा देश हा हा उपक्रम 9 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2023 दरम्यान संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे.या उपक्रमाची सुरुवात आज दिनांक 9 ऑगस्टला पंचप्राण शपथ ग्रहण करून जिल्हा परिषद नागपूर व नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत सर्व 13 पंचायत समितीमध्ये मोठ्या उत्साहाने करण्यात आलेली आहे.मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमात शीलाफलकम लावणे, अमृत वाटिका तयार करणे, वसुधा वंदन,पंचप्राण शपथ, ध्वजारोहण, असा पाच मुद्यांवरील उपक्रम नागपूर जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांमध्ये 9 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत राबविण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या कै.आबासाहेब खेडकर सभागृह आयोजित पंचप्राण शपथ ग्रहण करण्याच्या उपक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता विष्णूजी कोकड्डे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ विभागाचे सभापती दौलतरावजी कुसुंबे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे, जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या प्रकल्प संचालक श्रीमती वर्षा गौरकर इत्यादींसह जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारीवृंद उपस्थित होते.
तालुकास्तरावर उपरोक्त उपक्रम अंतर्गत शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत भवन इत्यादींमध्ये विविध उपक्रम जसे की विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, स्वातंत्रपर गीत गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच येणाऱ्या काळात जिल्हा अंतर्गत असलेल्या अमृत सरोवर परिसरात वृक्षारोपण, पंचप्राण शपथ ग्रहण तसेच प्रत्येक ग्रामपंचायत मधील ओंजळभर माती एकत्र करून तालुकास्तरावर मिट्टी कलश तयार करण्याचे नियोजित आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मुक्ता विष्णूजी कोकड्डे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा यांनी जिल्ह्यातील नागरिकांना मेरी माटी मेरा देश या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केलेले आहे.
सोबतच मेरी माटी मेरा देश -मिट्टी को नमन वीरो को वंदन या टॅग लाईन सहित स्वतःचे सेल्फी फोटोज merimatimeradesh.gov.in या वेबसाईटवर अपलोड करण्याचे सुद्धा आवाहन केलेले आहे.