प्राचार्यांच्या बैठकीत ‘मिशन युवा इन’ अभियानाचा घेतला आढावा
नागपूर समाचार : जिल्ह्यात ‘मिशन युवा इन’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत 75 हजार नवमतदार नोंदणी करायचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांनी मतदार नोंदणीसाठी सहकार्य करीत या कामास प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
मिशन युवा इन या अभियानाविषयी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अपर जिल्हाधिकारी आशा पठाण, उपमुख्य निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक मंगेश पाठक यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य प्रामुख्याने उपस्थित होते.
‘मिशन युवा इन’ या मतदार नोंदणी अभियानाची माहिती महाविद्यालयाच्या प्राध्यापक व प्राचार्यांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. देशाचे भवितव्य असलेल्या नवमतदारांच्या नोंदणीत वाढ होऊन लोकशाही बळकटीसाठी महत्वाचे ठरणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ‘मिशन युवा इन’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 75 हजार नवमतदारांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यादृष्टीने आज प्राथमिक आढावा बैठक घेण्यात आली.
तत्पूर्वी, जिल्ह्यातील विविध मतदार संघातील आतापर्यंतच्या मिशन युवा इन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा संक्षिप्त आढावा सादरीकरणाद्वारे सबंधित तहसिलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांद्वारे जिल्हाधिकाऱ्यांसमोर करण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिली पंचप्रण शपथ
9 ते 30 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात मेरी माटी मेरा देश हे अभियान राबविण्यात येत आहे. आज या अभियानाच्या पार्श्वभूमीवर बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना पंचप्रण शपथ दिली. या कार्यक्रमात चिमुकलेही मोठ्या उत्साहात सहभागी झाल्याचे पहायला मिळाले.