नागपुर समाचार : माझी माती माझा देश (मेरी माटी मेरा देश) या अभियानाला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तसेच महानगराच्या क्षेत्रात विशेषत: शाळांमधून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये प्रभात फेरी, राष्ट्रगान, दिवा तयार करणे, दिवा हाती घेऊन शपथ घेणे, तिरंगा वंदन, शीला फलक लावणे, आदी उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
मेरा मिट्टी मेरा देश हा उपक्रम 9 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2023 दरम्यान संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे.या उपक्रमाची सुरुवात काल दिनांक 9 ऑगस्टला पंचप्राण शपथ ग्रहण करून विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आदी प्रमुख अधिकाऱ्यांनी या उपक्रमाची सुरुवात केली.
शीलाफलकम लावणे,अमृत वाटिका तयार करणे, वसुधा वंदन, पंचप्राण शपथ ध्वजारोहण, असा पाच मुद्द्यांवरील उपक्रम नागपूर महानगरपालिका, नागपूर जिल्हा परिषद, नगरपंचायती नगरपरिषदा व ग्रामपंचायतमध्ये राबविण्यात येत आहे.
गावागावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतून शिलाफलक लावण्यात येत आहे यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश, त्या त्या परिसरातील शहीद,स्वातंत्र्य सैनिक, विविध युद्धामध्ये शहीद झालेले सैनिक यांच्या संदर्भातील माहिती अंकित केली जात आहे. प्रत्येक गावामध्ये एखाद्या शहीद स्मारकासारखे शिलाफलक लावण्यात येत आहे.
शाळांमधून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून स्वातंत्र्य दिनाच्या तयारीमुळे काही दिवस आधीच प्रभात फेरी तिरंगा वंदन मातृभूमी वंदन दिवे तयार करणे असे उपक्रम ठीक ठिकाणी राबविले जात आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी 25 ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यामध्ये निर्धारित सर्व उपक्रम राबविण्यात यावे, असे आवाहन केले आहे.