प्रत्येक महाविद्यालयाचा आढावा घेण्याचे निर्देश
नागपुर समाचार : महाविद्यालयीन प्राचार्यांनी नवमतदार नोंदणीसाठी मिशन मोडवर काम करावे. विद्यार्थ्यांकडून ऑलाफईन व ऑनलाईन नोंदणी करुन सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. यापुढे जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयाची यासंदर्भातील कामगीरी तपासण्यची सूचना त्यांनी संबधित यंत्रणेला केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे ‘मिशन युवा इन’ चा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे समन्वय अधिकारी डॉ. एम.एन पाठक, जिल्हा निबंधक सहकारी संस्था गौतम वालदे, अन्न व औषधी विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मिशन युवाच्या प्रारंभापासून आतापर्यंत 41 हजार नवमतदार नोंदणी झाली असून 75 हजार नोंदणीचे उद्दिष्ट आहे. येत्या दोन महिन्यात ते पूर्ण करण्याकडे लक्ष केद्रीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.
यावेळी त्यांनी शहरातील 10 नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संवाद साधला. परीक्षा फार्मसोबतच विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी फार्म देवून नोदणी करावी. उद्दिष्टांपेक्षा जास्त नोंदणी कशी होईल, याबाबत प्रयत्नशील रहावे. त्यासोबत बाजार समितीच्या मध्येही नोंदणी करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. हॉऊसिंग सोसायटी, सहकारी संस्थांना निवडणूक विषयक अधिकारी भेट देवून त्यांनी मतदार नोंदणीचा नमूना देतील. समन्वयातून मतदार संख्या वाढीसाठी जास्तीत जास्त जनजागृती करण्याचे त्यांनी सांगितले.
राजकीय पक्षांनी मतदार नोंदणी एजंटांना योग्य मार्गदर्शन करुन जास्तीत जास्त नोंदणी करण्याविषयी सांगावे व योग्य रितीने मोहिम राबवावी. निवडणूक हा पाच वर्षातील मोठा शासकीय उत्सव आहे. यासाठी मतदार नोंदणी मोहिमेत सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
प्रास्ताविकात तहसीलदार राहूल सारंग यांनी ‘मिशन युवा इन’ बाबत माहिती दिली. यामध्ये नवमतदार नोंदणी, 17 वर्षावरील विद्यार्थ्यांची नोंदणी, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नोंदणी, नाव वगळणी, दुबार मतदार असलेल्या व्यक्तीचे एकच नोंदणी आदी बाबत माहिती यावेळी त्यांनी दिली.
या बैठकीस नागपूर तसेच जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य, बाजार समिती अध्यक्ष, मेडिकल व हॉटेलचे प्रतिनिधी उपस्थित होते.