व्हीएमव्ही महाविद्यालयातील अभिनय कार्यशाळेचा समारोप
नागपूर समाचार : चित्रीकणासाठी जंगलात गेलो की मी बांबूच्या शोधात असतो. त्या बांबूच्या मी बासऱ्या बनवतो. माझ्याकडे दुधीभोपळ्याची, स्ट्रॉ ची देखील बासरी आहे. दुर्मिळ अश्या बासऱ्यांचा खजाना माझ्याकडे आहे, अशा शब्दात प्रसिद्ध अभिनेते, गायक रघुवीर यादव यांनी त्यांचे बासरीचे वेड उलगडले.
श्री नागपूर गुजराती मंडळ संचलित व्हीएमव्ही महाविद्यालयाच्या बी.व्होक नाट्य विभागाच्यावतीने आयोजित दोन दिवसीय अभिनय व दिग्दर्शन कार्यशाळेला आज समारोप झाला. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रघुवीर यादव यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी बी.व्होक नाट्य विभागाच्या संरक्षक वोल्गा ठाकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय मुद्गल, नाट्य विभाग प्रमुख प्रा. प्रियंका ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अभिनय क्षेत्रात गेलो नसतो तर गायक झालो असतो असे सांगताना रघुवीर यादव म्हणाले जेव्हा जेव्हा मी संकटात होतो तेव्हा तेव्हा संगीताने मला साथ दिली. वाद्य तयार करण्यात मी दिवसाचे दिवस घालवले आहेत. कोणतीही कला ही तुमचा सर्वात चांगला मित्र असते. तुम्हाला ती सुखदुःखात साथ देते असे यादव म्हणाले.
नाटक ही कला म्हणजे केवळ अभिनय नसून ती जगण्याची कला आहे. ही कला तुम्हाला आत्मविश्वास देते. भाषा, वर्तणूक सुधारून ती तुम्हाला सकटांचा सामना करण्यासाठी तयार करते. मला चित्रपटात जायचे नव्हते, केवळ नाटकच करायचे होते, असे त्यांनी सांगितले.
महाविद्यालांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नाट्यमंच, स्टुडिओ आदी सुविधा असून प्रतिथयश कलाकारांच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येतात अशी माहिती दिली.
कार्यशाळेचा थाटात समारोप
कार्यशाळेत आज दुसऱ्या दिवशी रघुवीर यादव व कला दिगदर्शक जयंत देशमुख यांचे मार्गदर्शन विद्यार्थांना लाभले. त्यानंतर झालेल्या समारोपीय सत्रात रघुवीर यादव यांनी ‘ महंगाई डायन डंख मार गई ‘ हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यशाळेत सुमारे 200 विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्वेता पत्की यांनी केले तर आभार प्रा.राधा मोहरे यांनी मानले.