प्रदर्शनात 50 स्टॉल; मोठ्या संख्येने नागपूरकरानी प्रतिसाद दयावा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन
नागपूर समाचार : महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त येत्या 1 ते 8 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नागपूरच्यावतीने खादी व ग्रामोद्योग वस्तूंचे प्रदर्शन येथील विदर्भ हिंदी साहित्य संघाच्या (मोर भवन ) सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. खादी ग्रामोद्योगच्या वस्तू म्हणजे विश्वास व दर्जा याचा मिलाप असून नागपूरकर जनतेने मोठ्या संख्येने प्रदर्शनी बघण्यासाठी व खरेदी करण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या उपस्थितीत दि. 1 ऑक्टोबर रोजी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. खादीपासून निर्मित विविध कापडांचे 25 स्टॉल्स या प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात येणार असून महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या औचित्याने खादी ग्रामोद्योग मंडळाकडून खादीच्या वस्तूंवर 20 टक्के सवलत असणार आहे. या सोबतच पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, मध केंद्र योजनेअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध झालेल्या उद्योजकांचेही 25 स्टॉल्स राहणार आहेत.
या प्रदर्शनात महाबळेश्वर येथील शुद्ध मधुबन मध, वर्धा नागपूर येथील खादीचे दर्जेदार कपडे, विविध प्रकारचे मसाले, लाकडी घाण्यावरील तेल, लाकडी हस्तकलेच्या वस्तू, फायबर मूर्ती, बांबूच्या कलात्मक वस्तू, आवळा खाद्य पदार्थ, गुळ, मेणबत्ती आदी वस्तूंचे स्टॉल या प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत. या प्रदर्शनात भेट देणाऱ्या ग्राहकांसाठी रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही असणार आहे.
ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जास्तीत-जास्त लोकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन वस्तू खरेदी कराव्या, असे आवाहन केले आहे. 1 ते 8 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी निःशुल्क खुले असणार आहे.