प्रशासकीय सेवेत नव्याने दाखल होणाऱ्या 250 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण; सर्वसामान्यांना उत्तम सेवा द्या
नागपूर समाचार : शेवटच्या लोकांपर्यंत प्रशासन पोहोचविण्यासाठी पारदर्शकतेने व प्रामाणिकपणे काम करा, असा सल्ला विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी शासनाच्या सेवेत नव्याने राजपत्रित अधिकारी म्हणून रूजू होत असलेल्या विविध विभागातील अधिकाऱ्यांना दिला.
वनामती येथे एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे उद्घाटन श्रीमती बिदरी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. यावेळी वनामतीच्या संचालक मिताली सेठी, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव लीना सांख्ये, कक्ष अधिकारी सुनिल निकम, प्रशिक्षण संचालक सुवर्णा पांडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय सेवेत राजपत्रित अधिकाऱ्यांसाठीच्या (वर्ग-दोन) नवव्या तुकडीच्या प्रशिक्षण सत्राला सुरूवात झाली असून याअंतर्गत प्रशासनातील विविध विभागांच्या 250 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण 104 आठवड्यांचे असून समाजमन व सामाजिक जाणिवा प्रगल्भ करतांनाच गतीमान प्रशासनासाठीच्या विविध विषयाच्या अभ्याससत्राचा समावेश यात करण्यात आला आहे.
प्रशासकीय सेवेमध्ये प्रवेश करतांना प्रशासन म्हणून लोकांची सेवा करायची आहे. त्या अनुषंगाने शेवटच्या माणसापर्यंत प्रशासन पोहचविण्याची जबाबदारी पूर्ण करायची असल्याचे सांगतांना श्रीमती बिदरी म्हणाल्या, प्रशासनामध्ये प्रामाणिकपणे काम करा, उत्तम सेवा देतांनाच जनतेसाठी सदैव उपलब्ध राहून सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य होईल, यासाठी पारदर्शकपणे सेवा उपलब्ध करून द्या. प्रशासकीय सेवेची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे ही भावना समोर ठेवून काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
प्रशासकीय सेवेत दाखल होतांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा उपयोग पुढील सेवेसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे प्रशिक्षणातील विविध उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन, मिताली सेठी यांनी केले. दैनंदिन कामामध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा जास्तीत-जास्त वापर करून प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या संकल्पना अधिक सुलभपणे कशा वापरता येईल याला प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
लीना सांख्ये म्हणाल्या, भारतीय प्रशासकीय सेवेच्या धरतीवरच राज्यसेवेत नव्याने दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी शासनातर्फे प्रशिक्षण धोरण तयार करण्यात आले आहे. अशा प्रकारचे धोरण केवळ महाराष्ट्रातच राबविल्या जात आहे. प्रशिक्षणाची सुरूवात 2004 पासून सुरू झाली असून प्रशासनामध्ये गतीमानता आणण्यासोबतच राज्यातील शेवटच्या मानसापर्यंत योजना पोहचविण्याचे काम नवीन अधिकाऱ्यांना करायचे आहे, असे त्या म्हणाल्या.
प्रास्ताविकात प्रशिक्षण संचालक सुवर्णा पांडे यांनी सांगितले, प्रशासकीय सेवेतील वर्ग दोन अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वनामतीची निवड करण्यात आली. या प्रशिक्षण केंद्रातून आतापर्यंत 1 हजार 133 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. चालू सत्रात 250 अधिकाऱ्यांना प्रशिक्षीत करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. किशोर वाघमारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार इंदिरा वाघ यांनी व्यक्त केले.
महिला अधिकाऱ्यांसाठी नवीन वसतिगृह
प्रशासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांसाठी नवीन बांधण्यात आलेल्या ‘वनलता’ या वसतीगृहाचे उद्घाटन विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते झाले. यावेळी आदिवासी विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, संचालक मिताली सेठी, प्रशिक्षण संचालक सुवर्णा पांडे, सहायक संचालक डॉ. विद्या मानकर उपस्थित होते.
महिला अधिकाऱ्यांना प्रशिक्षण कालावधीत निवास व्यवस्था नसल्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी वनामती परिसरात वनलता हे सर्वसुविधायुक्त वसतिगृह बांधण्यात आले आहे. या वसतिगृहात 60 कक्ष असून 120 महिला अधिकाऱ्यांची निवास व्यवस्था तसेच स्वतंत्र भोजन कक्ष, शिशू कक्ष आदी सुविधा उपलब्ध आहे. या वसतिगृहाच्या बांधकामासाठी कृषी विभागातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पाच मजले असलेली ही सुसज्ज इमारत महिला अधिकाऱ्यांच्या सेवेत आजपासून उपलब्ध झाली आहे. येथे महिलांसाठी उपलब्ध असणाऱ्या सेवांची तसेच इतर सुविधांची पाहणी विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी केली.
महिला वसतीगृह बांधकामासाठी सहकार्य करणाऱ्या मोहन चांदूरकर, वास्तूतज्ञ भूषण कोतवाल, नारायन बजाज, इंद्रजीत रामटेके, सुरज कुंभारे यांचा शालश्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून विभागीय आयुक्त यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
डॉ. विद्या मानकर यांनी महिला अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या वसतिगृहाबद्दल माहिती दिली.