- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : उद्योजकांचा ‘सिस्टीम’वरील विश्वास वाढवूया – जिल्हाधिकारी

उद्योग जगताला जिल्हास्तरावरून सर्व सहकार्य; उद्योग विभागाच्या कार्यशाळेचे उदघाटन

नागपूर समाचार : उद्योग विभाग हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. उद्योग जगताच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत असते. त्यामुळे उद्योग जगताला आवश्यक ते सहकार्य करीत उद्योजकांचा शासन व्यवस्थेवरील विश्वास वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी आज केले.

‘गुंतवणूक वृध्दी, व्यवसाय सुलभीकरण, निर्यात व एक जिल्हा एक उत्पादन’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन वनामती येथील सभागृहात जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने करण्यात आले. यावेळी उद्घाटनपर भाषणात श्री. इटनकर बोलत होते.

परकीय व्यापार महासंचालनालयाचे सहसंचालक डॅा. व्ही. श्रमण,, सहाय्यक आयुक्त अविनाश पांडे, उद्योग विभागाचे सहसंचालक गजेंद्र भारती, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवकुमार मुद्दमवार, जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, निर्यातदार, निर्यात संबंधित सर्व शासकीय, राज्य व केंद्र शासनाच्या यंत्रणा तसेच बँकांचे प्रतिनिधी व उद्योजक यावेळी उपस्थित होते.

उद्योग विभागाच्या कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल अभिनंदन करीत जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, कार्यशाळेचा फायदा हा उद्योग क्षेत्रातील अनेकांना होणार आहे. आयात निर्यात धोरण, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, परवानग्या आदी विषयांची माहिती या कार्यशाळेच्या माध्यमातून होणार आहे. डिसेंबरपर्यंत 75 लघू व मध्यम उद्योजक घडविण्याचे आव्हान स्वीकारण्याची गरज आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेचे हेच फलित राहणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

 उद्योजकांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योग विभागाचे केंद्र उभारण्याची संकल्पनाही जिल्हाधिका-यांनी यावेळी मांडली. जिल्हाधिकारी कार्यालयात जागा उपलब्ध करून दिली जाईल. सर्व आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाईल. या केंद्रामार्फत उद्योजकांच्या अडीअडचणी सोडविण्यात येतील, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

 उद्योजकांना उद्योगांची आवश्यक ती माहिती शासकीय स्तरावरून उपलब्ध होण्याची गरज आहे. अनेक प्रगतशील देशांनी सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या बळावर आपली प्रगती साधली आहे. कौशल्यपूर्ण रोजगाराची आज उद्योग जगताला गरज आहे. मिहानमध्ये उद्योजकांना अडचणी येत असल्यास संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

एकूण अठरा व्याख्याने

उद्योजकांसाठी कार्यशाळेत एकूण अठरा व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. देशभरातील शासकीय व अशासकीय तज्ज्ञांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. निर्यातीसाठी आवश्यक परवानग्या, प्लास्टिक क्षेत्रातील संधी, कृषी आधारित उद्योग, यशस्वीतांचे मनोगत, उद्योजकांसाठी केंद्र शासनाच्या योजना अशा विविध विषयांवर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *