67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आयोजनाची आढावा बैठक
नागपूर समाचार : 24 ऑक्टोबर 2023 रोजी दीक्षाभूमी नागपूर व ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे होणाऱ्या 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाच्या पूर्वतयारी संदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आढावा सभा घेण्यात आली. स्वच्छता राखण्यासाठी व अनुयायांना अधिक चांगली सुविधा देण्यासाठी यावर्षीचा धम्मचक्र प्रवर्तन दिन ‘प्लास्टिक फ्री झोन ‘ म्हणून दीक्षाभूमीवर राबवण्यात येईल असे या बैठकीत सर्व संमतीने ठरले.
दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन हा कायम परिवर्तनाचा दिशादर्शक उत्सव राहिला आहे.हा उत्सव यापुढे ‘प्लास्टिक फ्रि झोन’, उपक्रम ठरावा. या आयोजनामध्ये यापुढे प्लास्टिकचा वापर होता कामा नये, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. दीक्षाभूमीवरील स्वच्छता पाळताना आणि सुविधा उपलब्ध करताना मनपाच्या स्वच्छता विभागाने प्लास्टिक वापर अडचणीचा ठरत असल्याचे सांगितले. त्यामुळे पिण्याचे पाणी, खानपान, अन्नदान, शौचालय अन्य कोणत्याही कामासाठी प्लास्टिकचा वापर कोणीच करू नये, असे आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे डॉ.सुधीर फुलझेले, विलास गजघाटे, राजेंद्र गवई, एन.आर.सुटे, ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या वतीने माजी मंत्री सुरेखाताई कुंभारे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांच्यासह पोलीस व अन्य विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी विशेषत: पिण्याचे पाणी, स्वच्छतेसाठीचा पाणीपुरवठा, त्याची नियमितता,स्वच्छता – साफसफाई, प्रकाश व्यवस्था, बसेसची व्यवस्था, औषधोपचार व तात्पुरते दवाखाने, पोलीस व्यवस्था,अन्नदान वाटप,आगीसंबंधी प्रतिबंधक उपाययोजना, होर्डिंग व सूचनाफलक ,आकस्मिक पाऊस आल्यास निवास,नियंत्रण कक्ष,सीसीटीव्ही कॅमेरे,स्वयंसेवक उपलब्धता,आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, पुस्तकांचे स्टॉल, बाहेर पडण्यासाठीचे मार्ग या बाबत चर्चा केली.
सर्व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत राहतील, तसेच अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक स्टॉलची रचना राहील, याकडे लक्ष वेधले. दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी अनेक तपासण्या मोफत व्हाव्यात, तसेच आकस्मिक रुग्णसेवेसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची मोठ्या संख्येत तैनाती करण्याबाबतचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
पूरक व्यवस्थेची तयारी झाल्यानंतर सर्व जबाबदार अधिकाऱ्यांनी परस्परांशी समन्वय ठेवून पाहणी करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. बाहेरून येणाऱ्या अनुयायांना व्यवस्थेच्या अनुषंगाने कोणताही त्रास होणार नाही. रस्त्यांवर मोठ-मोठे गेट उभे राहून रस्ते अरुंद होणार नाही, खान-पानाच्या व्यवस्थेमध्ये रस्त्यावर घाण राहणार नाही, मोठ्या प्रमाणात कचरापेटींची उपलब्धता तसेच महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची विपुल उपलब्धता याची खातरजमा अधिकाऱ्यांनी करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.