‘माहिती अधिकार सप्ताहाचा’ समारोप
नागपूर समाचार : माहितीचा अधिकार कायद्याचा प्रभावी, परिणामकारक आणि प्रामाणिक वापर होणे ही काळाची गरज आहे. नागरिकांनी या कायद्याच्या जास्तीत जास्त वापरातून जागरूक व दक्ष सक्षम निर्मितीसाठी पुढे यावे, असे आवाहन राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी केले.
राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाद्वारे 6 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित माहिती अधिकार सप्ताहाचा आज वनामती येथे समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्री पांडे बोलत होते.
याप्रसंगी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, वनामतीच्या संचालक डॉ. मिताली सेठी, प्रशिक्षण संचालक सुवर्णा पांडे, माहिती अधिकार कार्यकर्ते व लेखक अभय कोलारकर यावेळी उपस्थित होते.
श्री. पांडे यांनी शासकीय प्राधिकरणांनी आपल्या माहितीचे डिजिटलायझेशन करून ऑनलाईन माहितीचा मार्ग नागरिकांसाठी मोकळा करून देण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. माहिती अधिकारातून प्रशासनातील त्रुटींकडे लक्ष वेधण्यात यावे. कायद्याचा वापर हा सामाजिक न्यायासाठी, लोकांचे प्रश्न सोडविण्याचे धोरण ठरवणाऱ्या मंडळीपर्यंत पोहोचण्यासाठी व्हावा. त्यावर मुठभर लोकांची मक्तेदारी असता कामा नये. माहिती अधिकाराच्या योग्य वापरातून समाजावर सकारात्क परिणाम व शासन व्यवस्थेला पारदर्शी करण्याचा उद्देश सफल व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यकत केली.
हे पारदर्शकतेच युग असून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपले कार्य प्रामाणिकपणे केल्यास माहिती अधिकार अडचण ठरणार नाही, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. माहिती अधिकार कायद्याचा दुरूपयोग करणाऱ्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्याची कायद्यात तरतूद असल्याचेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी नागरिकांना माहिती अधिकार वापरण्याची गरजच पडू नये म्हणून प्रशासनाद्वारे स्वयंप्रेरणेने जास्तीत जास्त माहिती ऑनलाईन उपलब्ध करण्याचे सांगितले.
‘सफर : माहिती अधिकाराचा’ पुस्तकाचे प्रकाशन
सुरवातीला माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर लिखीत ‘सफर : माहिती अधिकाराचा’ या त्यांच्या वेचक व वेधक अनुभवावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री कोलारकर यांनी लोकोपयोगी व सकारात्मक कार्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा उपयोग करण्याचे सांगितले. आपल्या अनुभवाचा नागरिकांना उपयोग व्हावा यासाठी पुस्तक प्रकाशित करत असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
मिताली सेठी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक माहिती उपसचिव रोहिणी जाधव यांनी तर कार्यक्रमाचे संचालन मिलींद तारे यांनी केले. कार्यक्रमाला माहिती अधिकार क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, वनामती येथे सेवा प्रशिक्षण घेत असलेले विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.